श्रीलंके विरूद्ध च्या दौऱ्यात ९-० असे निर्भेळ यशा मिळवल्यानंतर भारत आता मायदेशात कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. रविवारी १७सप्टेंबरला एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना चेन्नईमधील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे.
ऑस्ट्रेलिया या आधी बांगलादेश मध्ये कसोटी मालिका खेळून भारतात आली आहे, बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांना १-१ ने समाधान मानावे लागले होते. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका विजय मिळवून भारताचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
आता आयसीसी क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलिया ११७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका ११९ गुणांसह आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान आहेत. या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दोंन्ही संघाना १२० पेक्षा अधिक गुण कमवून क्रमवारीत पहिले स्थान मिळवण्याची संधी आहे.
महत्वाचे खेळाडू
भारत: विराट कोहली
भारताचा कर्णधार आणि भारतीय फलंदाजीच्या पाठीचा कणा असलेल्या विराट कोहली कडून या हि मालिकेत भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ऑक्टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ मध्ये विराटने २३ सामन्यांमध्ये ९८ च्या सरासरीने १३७५ धावा केल्या आहेत. कर्णधारपद मिळाल्यापासून विराटने फलंदाजीमध्ये कमालीचा उचांक गाठला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराटचा फॉर्म नेहमीच चांगला राहिला आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्ध २३ सामन्यात ५५च्या सरासरीने १००२ धावा केल्या आहेत, ज्यात त्याने ५शतके आणि ४ अर्धशतके लगावली आहेत.
ऑस्ट्रेलिया: स्टिव्ह स्मिथ
स्मिथ आणि भारताचे एक अतूट नटे आहे हे सर्व क्रिकेटप्रेमींना माहित आहे. भारतीय गोलंदाजांना स्मिथ बादच होत नाही आणि हे त्याच्या कसोटी आणि वनडे धावसंख्येवरून दिसून येते. त्याने वनडेत भारताविरुद्ध ९ सामन्यात ४६७ धाव केल्या आहेत. त्याची सरासरी ६७ ची तर स्ट्रॅक रेट १०० हुन अधिक आहे. त्याने या ९ सामन्यात ७ वेळा फलंदाजी करताना २ शतके तर १ अर्धशतक लगावले आहे.
खेळपट्टीचे अनुमान
भारतातील सर्वात जुन्या मैदानांपैकी हे एक मैदान आहे. या मैदानातील खेळपट्टी एकंदरीत फलंदाजीसाठी अनुकूल असेल. पहिल्या सत्रात वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीतून थोडी मदत मिळेल पण एकंदरीत बघता सामन्यात गोलंदाजांची खूप धुलाई होणार हे नक्की. या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे.
मागील ५ सामन्यांचा निकाल
भारत
विजय, विजय, विजय, विजय, विजय.
ऑस्ट्रेलिया
विजय,अनिर्णित, अनिर्णित, अनिर्णित, हार.
संभाव्य संघ
भारत संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यज्वेंद्र चहल, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), हिल्टन कार्टराईट, नॅथन कॉल्टर-नाइल, ऍरॉन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉल्कनर, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, केन रिचर्डसन.