जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलात मंगळवारी जमशेदपूर एफसी आणि ओडिशा एफसी यांच्यात लढत होत आहे. त्यात मनोरंजक खेळ करण्यासाठी दोन्ही संघ उत्सूक असतील.
जमशेदपूरचा हा तिसरा मोसम आहे. गेल्या दोन मोसमांमध्ये त्यांचे प्ले-ऑफमधील स्थान थोडक्यात हुकले आहे. त्यामुळे यावेळी ही कामगिरी साकार करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. दोन्ही मोसमांत त्यांचे मुख्य प्रशिक्षक वेगळे होते. त्यांनी आपली स्वतःची शैली क्लबमध्ये निर्माण केली. आता तिसऱ्या प्रशिक्षकांकडे सुत्रे आली आहेत. स्पेनच्या अँटीनिओ इरीओंदो यांच्याकडून चाहते आक्रमक धोरण असलेल्या खेळाची अपेक्षा करू शकतील.
अँटोनिओ यांनी सांगितले की, ओडिशा आक्रमण करेल तेव्हा आम्ही बचावाचा प्रयत्न करू, पण 90 मिनिटांच्या कालावधीत चेंडूवर प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त ताबा ठेवण्यास आम्हाला आवडेल. तेच आमचे लक्ष्य असेल. आमच्या शैलीद्वारे चाहत्यांना आनंदीत करणे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.
काही खेळाडूंनी क्लब सोडण्याच्या घडामोडींनाही जमशेदपूरला सामोरे जावे लागले. मारीओ आर्क्वेस आणि सर्जिओ सिदोंचा ही स्पेनची जोडी केरला ब्लास्टर्स एफसीकडे दाखल झाली आहे, पण सी. के. विनीत याला आणून जमशेदपूरने आपली आघाडी फळी भक्कम केली आहे. आयएसएलमध्ये भारतीय खेळाडूंत सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत विनीत तिसरा आहे. परदेशी खेळाडूंमध्ये त्यांनी फ्रान्सिस्को पिटी लुना आणि न्यो ऍकोस्टा यांना करारबद्ध केले, तर स्टार खेळाडू मेमो आणि टिरी यांना कायम ठेवले.
अँटोनिओ यांनी सांगितले की, पहिल्या सामन्यात स्वाभाविकच जास्त दडपण असते आणि जिंकण्यासाठी त्याचा सामना करावा लागतो. खेळाडूंनी कसून सराव केला आहे. मैदानावर निर्णय घेण्यास ते तयार आहेत. आम्हाला कसा खेळ करायचा आहे याची त्यांना कल्पना आहे.
जोसेप गोम्बाऊ यांच्या दिल्ली डायनॅमोजला केवळ आठवे स्थान मिळविता आले, पण त्यांच्या खेळात एक प्रकारचा जोश आणि रोमांच होता. आता दिल्लीचा संघ भुवनेश्वरला स्थलांतरीत झाला आहे. दिल्ली डायनॅमोज ऐवजी ओडिशा एफसी असे नाव त्यांनी धारण केले आहे. आपल्या हाती असलेल्या तरुण संघाबरोबरील प्रकल्प पुढे नेण्यास गोम्बाऊ प्रयत्नशील राहतील. मैदानावर त्यांना सरस निकालांची अपेक्षा असेल.
दिल्लीसाठी स्टार ठरलेला विंगर लालीयनझुला छांगटे चेन्नईयीन एफसीकडे गेला आहे, पण डॅनिएल लालहलीम्पुईया, जेरी माहमिंगथांगा आणि नंदकुमार शेखर यांची आघाडी फळी ओडिशाला भेदक आक्रमण रचून देईल.
गोम्बाऊ यांनी सांगितले की, मागील मोसम संपला आहे. आता आम्ही नव्या शहरात नव्या क्लबपासून प्रवास सुरु करीत आहोत. बरेच खेळाडू तेच आहेत आणि आमचा संघ चांगला आहे असे वाटते. संघ सुधारण्यासाठी सर्व करार पूर्ण करण्यात आले. आमच्याकडे परिपूर्ण संघ आहे असे वाटते.
गोम्बाऊ यांच्या संघाला चेंडूवर ताबा राखण्यास आवडते. जमशेदपूरविरुद्ध त्यांची आपल्याप्रमाणेच वर्चस्वास आतूर प्रतिस्पर्ध्यांशी गाठ पडलेली असेल. त्यामुळे ही लढत मध्य क्षेत्रात रंगतदार ठरेल. विनीत राय आणि अनुभवी मार्कोस टेबार असे खेळाडू ओडिशा एफसीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतील.
गोम्बाऊ म्हणाले की, आम्ही रोमांचित आहोत. आम्हाला चांगली कामगिरी करायची आहे. फुटबॉलचा खेळ आमच्याकरीता आनंद लुटण्यासाठी आहे. आम्ही येथे याच मानसिकतेसह आलो आहोत.
विशेष उत्सुकतेची बाब म्हणजे या लढतीला स्पॅनीश रंग असेल. स्पेनच्या दोन प्रशिक्षकांमधील ही लढत असेलच, पण परदेशी खेळाडूंमध्येही दोन्ही संघांमध्ये स्पेनचा संदर्भ आहे.
शिस्को हर्नांडेझ, ऍ रीडेन सँटाना यांच्यासह ओदीशाकडे जमशेदपूरप्रमाणेच पाच स्पॅनीश खेळाडू आहेत. यात कुणाची सरशी होणार याची उत्कंठा असेल.