सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल २०२० च्या हंगामातून बाहेर पडला आहे. याबद्दल हैदराबाद संघाने मंगळवारी पुष्टी केली असून त्यांनी भुवनेश्वरचा बदली खेळाडू म्हणून पृथ्वी राज याराची निवड केली आहे.
भुवनेश्वर कुमारला मांडीच्या स्नायूची दुखापत झाली आहे. ही दुखापत त्याला शुक्रवारी, २ ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गोलंदाजी करताना १९ व्या षटकात झाली होती. त्याला ही दुखापत झाली तेव्हा मैदानातून बाहेर जातानाही त्याला वेदना होत होत्या.
भुवनेश्वरच्या आयपीएलमधून बाहेर पडण्याबद्दल हैदराबादने मंगळवारी ट्विट केले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘दुखापतीमुळे भुवनेश्वर आयपीएल २०२०मधून बाहेर पडला आहे. आम्ही तो लवकर बरा व्हावा अशी आशा व्यक्त करतो. उर्वरित आयपीएल मोसमासाठी पृथ्वी राज यारा त्याचा बदली खेळाडू म्हणून संघात सामील होईल. ‘
https://twitter.com/SunRisers/status/1313402952346865665
मध्यमगती गोलंदाज असलेला पृथ्वी राज यारा आंध्रप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने आत्तापर्यंत ११ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ३९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ९ अ दर्जाचे सामने खेळले आहेत. यात त्याने १५ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने ३ टी२०चे सामने खेळले आहेत. यात त्याने ४ विकेट्स घेतल्या आहेत.
पृथ्वी आयपीएलमध्ये याआधी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. त्याने कोलकाताकडून मागीलवर्षी आयपीएलमध्ये हैदराबाद विरुद्ध पदार्पण केले होते. त्याने कोलकाताकडून २ सामने खेळले असून १ विकेट घेतली आहे.