सध्या भारतीय संघाबाहेर असलेला युवा सलामीवीर पृथ्वी शॉ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने धावांचा रतीब घातला आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत देखील त्याने दुखापतग्रस्त असतानाही फलंदाजीला येऊन संघाच्या विजयाची पायाभरणी केली.
पृथ्वीने केला विक्रम
पृथ्वी शॉने भारतीय संघामधून बाहेर होताच चांगला फॉर्म धरला आहे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याची बॅट तळपली आणि आता अंतिम सामन्यातही त्याने ७३ धावा केल्या. यासह, या २१ वर्षीय खेळाडूने विजय हजारे ट्रॉफीच्या एका हंगामात ८०० धावा करणारा पहिला फलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याने आता मोसमातील आठ सामन्यात एक दुहेरी शतक, तीन शतके आणि एका अर्धशतकासह ८२७ धावा केल्या आहेत, जो एक विक्रम आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
८२७ धावा – पृथ्वी शॉ (२०२१ वर्ष)
७३७ धावा – देवदत्त पडीक्कल (२०२१ वर्ष)
७२३ धावा – मयंक अगरवाल (२०१८ वर्ष)
६०९ धावा – देवदत्त पडीक्केल (२०१९ वर्ष)
६०७ धावा – दिनेश कार्तिक (२०१७ वर्ष)
क्षेत्ररक्षण करताना झाली दुखापत
रविवारी (१४ मार्च) उत्तर प्रदेश विरुद्ध विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात क्षेत्ररक्षण करताना मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉच्या पाय दुखापत झाली. त्यानंतर, सहकारी खेळाडूंनी उचलून घेत मैदानाबाहेर नेले. तो फलंदाजी करेल की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु, पृथ्वीने फलंदाजीला उतरला पुन्हा एकदा चाहत्यांकडून कौतुक वसूल करून घेतले. त्याने, १० चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ३९ चेंडूत ७३ धावा फटकावल्या. तो वेगाने शतकाकडे मार्गक्रमण करत असताना, शिवम मावीने त्याला बाद केले.
उत्तर प्रदेशच्या डावाच्या २४ व्या षटकात लेगस्पिनर प्रशांत सोलंकी गोलंदाजी करत असताना, माधव कौशिकने मारलेला चेंडू स्लीपमध्ये उभ्या असलेल्या पृथ्वीच्या पायावर लागला. त्यानंतर, वेदना असह्य झाल्याने पृथ्वी मैदानावर कोसळला. संघातील राखीव खेळाडूंनी त्याला उचलून मैदानाबाहेर नेले.
अंतिम सामन्यात मुंबईचे पारडे जड
तब्बल १६ वर्षानंतर अंतिम फेरी गाठलेला उत्तर प्रदेशचा संघ तिसऱ्यांदा विजेतेपदाचा सामना खेळत आहे. माधव कौशिकच्या नाबाद १५७ आणि समर्थसिंग-अक्षदीप नाथच्या अर्धशतकांमुळे यूपीने मुंबईसमोर ३१३ धावांचे लक्ष्य ठेवले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा, मुंबईने आदित्य तरेच्या शतकाच्या जोरावर ३७ षटकांत ३७ षटकात ३ बाद २७० धावा केल्या आहेत. मुंबईने अखेरच्या वेळी ही स्पर्धा २०१८-२०१९ मध्ये जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईविरुद्ध १५८ धावांची खेळी केलेल्या माधव कौशिकने एक-दोन नव्हे तब्बल ५ विक्रमांना घातली गवसणी
बापरे! कोरोना काळातही पहिल्या टी२० सामन्याला उपस्थित होते तब्बल ‘इतके’ हजार प्रेक्षक
युवराज सिंग भारतीय संघात पुनरागमन करणार? पहा काय म्हणाला