हैद्राबाद। भारताने आज(14 आक्टोबर) विंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी 10 विकेटने विजय मिळवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. या मालिकेचा मालिकावीर पुरस्कार 18 वर्षीय युवा पृथ्वी शॉला देण्यात आला आहे.
ही मालिका पृथ्वी शॉची पदार्पणाची कसोटी मालिका होती. त्यामुळे पदार्पणाच्या कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार मिळवणारा तो चौथाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तर जगातील एकूण 10 वा क्रिकेटपटू ठरला आहे.
याआधी असा पराक्रम सौरव गांगुली, आर अश्विन आणि रोहित शर्मा या भारतीय क्रिकेटपटूंनी केला आहे. तसेच रोहित, अश्विन आणि शॉ या तिघांनीही विंडिज विरुद्धच कसोटी पदार्पण करताना ही कामगिरी केली आहे. तर गांगुलीने इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
याबरोबरच पृथ्वी हा वयाची 20 वर्षे पूर्ण करण्याआधी मालिकावीर पुरस्कार मिळवणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू देखील ठरला आहे.
पृथ्वीने या मालिकेत 2 सामन्यात एक शतक आणि एक अर्धशतक करताना 118.50 च्या सरासरीने 237 धावा केल्या आहेत.
पृथ्वीने 4 आॅक्टोबर 2018 ला विंडिज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. त्याने या पदार्पणाच्या सामन्यातच 134 धावांची शतकी खेळी केली. तर विंडिज विरुद्ध आज (12 आॅक्टोबर) पार पडलेल्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 70 तर दुसऱ्या डावात नाबाद 33 धावांची खेळी केली आहे.
पदार्पणाच्या कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार मिळवणारे क्रिकेटपटू-
सौरव गांगुली – भारत, 1996 (इंग्लंड विरुद्ध)
जॅक रुडॉल्फ – दक्षिण आफ्रिका, 2003 (बांगलादेश विरुद्ध)
स्टुअर्ट क्लार्क – आॅस्ट्रेलिया, 2006 (दक्षिण आफ्रिका विरुद्ध)
अजंता मेंडीस – श्रीलंका, 2008 (भारत विरुद्ध)
आर अश्विन – भारत, 2011 (विंडिज विरुद्ध)
वर्नोन फिलँडर – दक्षिण आफ्रिका, 2011 (आॅस्ट्रेलिया विरुद्ध)
जेम्स पॅटिन्सन – आॅस्ट्रेलिया, 2011 (न्यूझीलंड विरुद्ध)
रोहित शर्मा – भारत, 2013 (विंडिज विरुद्ध)
मेहेदी हसन – बांगलादेश, 2016 (इंग्लंड विरुद्ध)
पृथ्वी शॉ – भारत,2018(विंडिज विरुद्ध)
महत्वाच्या बातम्या-
- पृथ्वी शॉने मोडला डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम
- पृथ्वी शाॅने घातली आणखी एका अनोख्या विक्रमाला गवसणी
- उरणला होणार रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा, जाणून घ्या सर्व काही..