भारताचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ शनिवारी (9 नोव्हेंबर) 25 वर्षांचा झाला. एकेकाळी पृथ्वीची तुलना ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर आणि दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्याशी केली जात असे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) एका व्हिडिओमध्ये पृथ्वीला ‘पुढचा सचिन तेंडुलकर’ असं म्हटलं होतं. मात्र आता टीम इंडियात सोडा, पृथ्वी शॉला देशांतर्गत क्रिकेटमध्येही संधी मिळत नाहीये!
रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात पृथ्वीला मुंबईच्या संघातून वगळण्यात आलं. पृथ्वीनं पहिले दोन सामने नक्कीच खेळले, परंतु त्यानंतर त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पृथ्वी शॉचं वजन जास्त असल्याचं मुंबईचे निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाचं मत आहे. तो सराव सत्रांना गांभीर्यानं घेत नाही आणि सरावाला नियमितपणे हजेरी लावत नाही, असंही आढळून आलं. पृथ्वीनं भारतासाठी आतापर्यंत 5 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 1 टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. 2018 मध्ये राजकोट येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
पृथ्वी शॉनं 25 जुलै 2021 रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. हा त्याचा पहिलाच टी20 आंतरराष्ट्रीय सामनाही होता. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या या पदार्पणाच्या टी20 सामन्यात पृथ्वीला आपलं खातंही उघडता आलं नव्हतं. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. म्हणजेच त्याला टी20 पदार्पणानंतर भारतीय संघात स्थान पुन्हा मिळालेलं नाही. एवढेच नाही तर आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी पृथ्वीला दिल्ली कॅपिटल्सनं संघातून रिलिज केलं आहे.
तसं पाहिलं तर पृथ्वी शॉनं अगदी कमी वयात मोठं यश संपादन केलं होतं. 2013 मध्ये त्यानं मुंबईतील एका क्लब सामन्यात 500 हून अधिक धावांची खेळी खेळली होती. त्यानंतर 2018 मध्ये टीम इंडियानं त्याच्या नेतृत्वाखाली अंडर 19 विश्वचषक जिंकला. यानंतर त्याला लगेच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळालं. मात्र तो संघातील आपली जागा टिकवून ठेवू शकला नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर पृथ्वी शॉ विविध वादांत अडकत गेला. 2019 मध्ये तो डोपिंग चाचणीत नापास झाला, ज्यानंतर बीसीसीआयनं त्याच्यावर 8 महिन्यांची बंदी घातली होती. 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पृथ्वीनं टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळालं नाही. त्यावेळी पृथ्वीचं ड्रेसिंग रुममधील वर्तनही चांगलं नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
कोरोनाच्या काळात पृथ्वी शॉवर लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप झाला होता. तो ई-पासशिवाय गोव्याचा प्रवास करत होता. वाटेत त्याला पोलिसांन रोखले. सुमारे तासभर वाट पाहिल्यानंतर पृथ्वी शॉनं मोबाईलद्वारे ई-पाससाठी अर्ज केला. त्यानंतर त्याला गोव्याला जाण्याची परवानगी मिळाली.
2023 हे वर्ष पृथ्वी शॉसाठी अडचणींनी भरलेलं होते. त्या वर्षी त्याचं सोशल मीडिया स्टार सपना गिल आणि तिच्या मित्रांसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये भांडण झालं. हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं होतं, ज्याचे व्हिडिओही व्हायरल झाले. या प्रकरणी पृथ्वी शॉच्या वतीनं गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये 8 जणांवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी सपना गिलला अटकही करण्यात आली होती.
हेही वाचा –
भारताचा व्हाईटवॉश! ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध ऋतुराज ब्रिगेडचा दारुण पराभव
टीम इंडियात फूट? गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात एकमत नाही! अहवालात धक्कादायक खुलासा
IND vs SA; शतक झळकावल्यानंतर संजू सॅमसनच्या नावावर झाले 5 मोठे रेकाॅर्ड