भारतीय संघाचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध 6 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेआधी भारताला मोठा धक्का बसला आहे.
या मालिकेआधी सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आॅस्ट्रेलिया एकादश विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या सराव सामन्यात भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ शुक्रवारी(30 नोव्हेंबर) दुखापतग्रस्त झाला आहे. त्याला डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली आहे.
त्यामुळे त्याला अॅडलेड येथे होणाऱ्या पहिल्या सामन्याला मुकावे लागणार असल्याची बीसीसीआयने माहिती दिली आहे.
शुक्रवारी सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पृथ्वीच्या या दुखापतीबद्दल भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने माहिती दिली आहे की ‘त्याचा घोटा दुखत असून सुजलाही आहे.’
‘पृथ्वी पहिल्यांदाच क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलेला असतानात असे होणे हे काहीसे दु:खदायक आहे. तो जास्त बोलत नाहिये. त्याला याचे खूप वाईट वाटले आहे.’
‘एक युवा खेळाडू, जो आॅस्ट्रेलियामध्ये त्याची कसोटी कारकिर्दीची सुरुवात करण्याचे स्वप्न घेऊन आणि खेळण्यासाठी आला आहे, त्याच्यासाठी ही दुखापत खूप कठीण गोष्ट आहे.’
त्याचबरोबर शॉसाठी हे दुर्दैवी असले तरी यामुळे दुसऱ्याला संधी मिळणार आहे, असे अश्विनने म्हटले आहे. तो म्हणाला, ‘मला असे नाही म्हटले पाहिजे, पण जे झाले ते दुर्दैवी आहे आणि अशा गोष्टी खेळामध्ये होत असतात. ही दुसऱ्यांसाठी संधी आहे. माझा विश्वास आहे काहीतरी कारणासाठी गोष्टी घडतात. त्यामुळे जर ही गोष्ट कोणत्यातरी चांगल्या कारणामुळे झाली असेल तर मी आनंदी आहे.’
शॉला क्षेत्ररक्षण करताना बाउंड्री लाइनच्या जवळ मिड-विकेटला असताना झेल घेण्याच्या प्रयत्नात डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला लगेचच दवाखान्यात नेण्यात आले होते. त्याला या दुखापतीनंतर मैदानातूनही भारतीय संघाच्या मेडिकल टीमने अक्षरश: उचलुन ड्रेसिंगरुममध्ये नेले होते.
19 वर्षीय शॉने या सामन्यात पहिल्या डावात 69 चेंडूत 66 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्याचा हा फॉर्म पाहता त्याला पहिल्या कसोटीत सलामीला संधी मिळणार हे जवळजवळ पक्के होते. पण आता त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–८ वर्षांनी टीम इंडिया जिंकणार विश्वचषक, जाणून घ्या काय आहे कारण
–पृथ्वी शाॅ नसेल तर रोहित शर्माला सलामीला घ्या, पहा कुणी केलीय मागणी
–क्रिकेट क्रिकेटसारखच खेळा, जोशात प्रामाणिकपणा सोडू नका
–हुंदळेवाडीचा वाघ… सिद्धार्थ देसाई
–हॉकी विश्वचषक २०१८: पाॅकेटमनी खर्च करुन तो संघ आलाय भारतात