स्फोटक फलंदाज पृथ्वी शॉचा आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता पृथ्वीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर आपली व्यथा मांडली.
शुक्रवारी (20 डिसेंबर) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं शॉचा संघात समावेश न करण्याबाबत धक्कादायक खुलासा केला होता. या वरिष्ठ अधिकाऱ्यानं ‘पीटीआय’ला सांगितलं की, खराब फिटनेस आणि बेशिस्तीच्या मुद्द्यांमुळे शॉला संघात स्थान देण्यात आलं नाही. अनेक ज्येष्ठ खेळाडू त्याच्याबद्दल तक्रारी करत होते. मैदानावर त्याला क्षेत्ररक्षण करताना चेंडू पकडता आला नाही आणि फलंदाजी करताना तो चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, असंही या अधिकाऱ्यानं म्हटलं होतं.
आता पृथ्वी शॉनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत अधिकाऱ्यानं केलेल्या आरोपांवर टीका केली आहे. शॉनं आपलं म्हणणं मांडण्यासाठी इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. त्यानं एक फोटो शेअर केला, ज्यावर लिहिलं आहे, “जर तुम्हाला पूर्णपणे समजत नसेल तर त्याबद्दल बोलू नका. बरेच लोक अर्धवट तथ्यांसह पूर्ण मतं मांडतात.” पृथ्वीचा रोख कोणाकडे आहे, हे यावरून सहज कळतं.
Prithvi Shaw’s Instagram story on MCA official’s interview. pic.twitter.com/nBk8yKw7nu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 20, 2024
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीप्रमाणेच विजय हजारे ट्रॉफीमध्येही मुंबईच्या संघात नक्कीच स्थान मिळेल, अशी शॉला आशा होती. परंतु मुंबई क्रिकेट असोसिएशननं या सलामी फलंदाजाला मोठा धक्का दिला. खराब फिटनेस आणि कामगिरीत सातत्य नसल्यामुळे शॉला सतत टीकेला सामोरं जावं लागत आहे. एक काळ असा होता जेव्हा चाहते त्याला पुढचा सचिन तेंडुलकर म्हणायचे. 2018 मध्ये भारतानं अंडर 19 विश्वचषक जिंकला त्या संघाचा शॉ कर्णधार होता. यानंतर त्याची कारकीर्द रॉकेटच्या वेगानं पुढे सरकली. परंतु कालांतरानं मैदानाबाहेरील विवादांमुळे त्याच्या करिअरला ब्रेक लागला.
पृथ्वी शॉला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा आयपीएल 2025 च्या लिलावात तो अनसोल्ड राहिला. त्यानं आपली बेस प्राईज 75 लाखपर्यंत कमी करून देखील कोणत्याही संघानं त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. आता शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये कसं पुनरागमन करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा –
भारताला मिळाली ‘लेडी झहीर खान’! मास्टर ब्लास्टरने शेअर केला बॉलिंगचा भन्नाट व्हिडिओ
या दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीची नवी तारीख समोर
मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत चिंता, बंगालच्या या निर्णयामुळे चाहत्यांची धाकधूक वाढली






