भारतीय कसोटी संघाचा ‘नवी द वॉल’ म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साउथम्पटन येथे झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात सपशेल फ्लॉप ठरल्यानंतर त्याच्यावर टीकेचा भडिमार केला जात आहे. ४ ऑगस्टपासून भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमित ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
अशात अनेकांनी पुजाराला इंग्लंडविरुद्ध संधी न देण्याची मते मांडली आहेत. तसेच पुजाराचे सुरुवातीच्या कसोटीतही वाईट प्रदर्शन चालू राहिले तर त्याची जागा कोण घेईल? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग यांनी पुजाराबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या दिग्गजाच्या मते, पुजाराचे निराशाजनक प्रदर्शन पाहता त्याला इंग्लंडविरुद्ध संधी मिळणे अवघड दिसत आहे. युवा सलामीवीर पृथ्वी शॉ त्याचा उत्तम पर्यायी खेळाडू ठरू शकतो. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्ध कसोटीत मैदानावर उतरवावे. पृथ्वी सध्या युवा भारतीय संघासह श्रीलंका दौऱ्यावर आहे.
ट्विटरवरील प्रश्न-उत्तरांच्या सेशनमध्ये एका ट्विटर वापरकर्ताने हॉग यांना यासंदर्भात प्रश्न विचारला. तो म्हणाला की, ‘इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केएल राहुल चेतेश्वर पुजाराचा पर्यायी खेळाडू ठरू शकतो का?’
या प्रश्नाचे उत्तर देताना हॉग म्हणाले की, “जर कोण पुजाराचा पर्याय ठरणार असेल तर तो केवळ पृथ्वी शॉ असू शकतो. तो इंग्लंडच्या भूमीत सलामीला फलंदाजी न करता तिसऱ्या क्रमांकावर चांगले प्रदर्शन करेल. त्याच्यात खूप प्रतिभा आहे आणि त्याचे भविष्यही खूप उज्ज्वल आहे. तो इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाचा भाग नाही. पण त्याला वाइल्ड कार्डद्वारे निवडले जाऊ शकते.”
If anyone was going to replace Pujara it would be Prithvi Shaw. Feel he is more suited there than opening. Has a lot of talent and long future. He is not in the tour group but a wild card choice. #EngvIND https://t.co/8wEF82aq1A
— Brad Hogg (@Brad_Hogg) July 2, 2021
यानंतर हॉग यांच्या म्हणण्यानुसार खरोखरच विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन पुजाराला बाकावर बसवत पृथ्वीला आजमावून पाहतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पृथ्वीचा कसोटीतील अनुभव पुजाराच्या मानाने खूप कमी आहे. परंतु त्याने आपल्या प्रदर्शनाने या स्वरुपात स्व:तला सिद्ध केले आहे. आतापर्यंत केवळ ५ कसोटी सामने खेळताना त्याने ४२.३८ च्या सरासरीने ३३९ धावा फटकावल्या आहेत. त्यामुळे पृथ्वीला पुजाराच्या जागी आजमावून पाहणे, हा एका अर्थाने योग्य निर्णय ठरु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
ENGvIND: शेवटच्या वनडेपुर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, कर्णधार मिताली राज पूर्णपणे फिट
विराट कोहलीच्या नेतृत्त्वपदावर टांगती तलवार, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मिळतील फक्त ४ महिने!
भयावह प्रसंग! लाईव्ह सामन्यात अचानक विंडीजच्या २ खेळाडूंना आली चक्कर, रुग्णालयात केलं भरती