आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला याचवर्षी १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आता या विश्वस्तरीय स्पर्धेसाठी आयसीसीने बक्षीस रकमांची घोषणा केली आहे. यंदा टी२० विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी होणार असून या संघांवर पैशाला पाऊस पडेल.
आयसीसीने घोषित केल्याप्रमाणे टी२० विश्वचषक विजेच्या संघाला १.६ मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास १२ कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला ८ लाख डॉलर (६ कोटी) बक्षीस रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन संघांना ४ लाख डॉलर (३ कोटी) मिळतील. या संपूर्ण स्पर्धेसाठी तब्बल ५.६ मिलियन डॉलर म्हणजेच ४२ कोटी रुपये बक्षीस रक्कम म्हणून आयसीसीने जाहीर केले आहेत.
या स्पर्धेत १६ संघांचे दोन विभाग करण्यात आले आहेत. यातील टी२० क्रमवारीतील अव्वल ८ संघ थेट सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर, अन्य ८ संघ पहिली फेरी खेळून सुपर १२ फेरीसाठी पात्रता सिद्ध करतील.
आयसीसीकडून सुपर १२ फेरीतील प्रत्येक विजयासाठी देखील बोनस रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. २०१६ ला झालेल्या टी२० विश्वचषकातही अशाचप्रकारे बक्षीस देण्यात आले होते. सुपर १२ फेरीत एकूण ३० सामने होणार आहेत. यामध्ये प्रत्येक विजयासाठी आयसीसी संघांना ४० हजार डॉलर बक्षीस देणार आहे. या फेरीसाठी विजयी सामन्यांसाठी बक्षीसाची एकूण रक्कम १२ लाख डॉलर आहे.
तसेच सुपर १२ फेरीमधून बाहेर पडणाऱ्या संघांना प्रत्येकी ७० हजार डॉलर मिळणार आहेत. या फेरीतून एकूण ८ संघ बाहेर पडतील. त्यामुळे, ही रक्कम मिळून एकूण ५ लाख ६० हजार डॉलर इतकी असेल.
केवळ सुपर १२ फेरीसाठीच नाही, तर त्याआधी पार पडणाऱ्या पहिल्या फेरीसाठीही बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. या फेरीत १२ सामने पार पडणार असून विजयासाठी संघांना ४० हजार डॉलर दिले जातील. त्यामुळे विजयी सामन्यांसाठीची एकूण रक्कम ४ लाख ८० हजार डॉलर असेल. तसेच या फेरीतून एकूण ४ संघ बाद होतील. बाद होणाऱ्या संघांना प्रत्येकी ४० हजार डॉलर मिळतील. त्यामुळे ४ संघांसाठी आयसीसी एकूण १ लाख ६० हजार डॉलर खर्च करेल.
टी२० विश्वचषकाबद्दल थोडक्यात
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. हे टी२० विश्वचषकाचे ७ वे पर्व आहे. हा विश्वचषक भारतात पार पडणार होता. मात्र, कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे ही स्पर्धा युएई आणि ओमानला हलवण्यात आली. असे असले तरी स्पर्धेचे यजमानपद भारताकडेच असणार आहे.
या विश्वचषकाची सुरुवात १७ ऑक्टोबरपासून पहिल्या फेरीपासून होईल. त्यानंतर २३ ऑक्टोबरपासून मुख्य स्पर्धेला म्हणजेच सुपर १२ फेरीला सुरुवात होईल. या स्पर्धेचा पहिला सामना ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. तसेच सुपर १२ फेरीतील पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याने होईल. यानंतर २४ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ दुबई येथे आमने-सामने येतील.
बाद फेरीचे सामने १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान पार पडतील. १० आणि ११ नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने होतील, तर १४ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल.
या विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. टी२० क्रमवारीत अव्वल ८ स्थानांवर असलेले संघ थेट सुपर १२ च्या फेरीत खेळतील. तर अन्य ८ संघांमध्ये पहिली फेरी पार पडेल. त्यातील ४ संघ (प्रत्येक गटातील अव्वल २ संघ) सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीत १२ संघांची २ गटात विभागणी होईल. म्हणजे प्रत्येक गटात ६ संघ असतील.
सुपर १२ च्या फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी एकमेकांसमोर येतील.
या स्पर्धेचे सर्व सामने दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबुधाबीमधील शेख झायद स्टेडियम, शारजाहमधील शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी ग्राऊंड येथे पार पडणार आहे.
टी२० विश्वचषकासाठी संघांची गटवारी
पहिली फेरी
गट अ – श्रीलंका, आयर्लंड, नामीबिया आणि नेदरलंड्स
गट ब – ओमान, बांगलादेश, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी
सुपर १२ फेरी
पहिला गट – वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका, गट अ मधील अव्वल क्रमांकाचा संघ आणि गट ब मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ
दुसरा गट – भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट अ मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ आणि गट ब मधील अव्वल क्रमांकाचा संघ
महत्त्वाच्या बातम्या –
मॅक्सवेलवरील १४.२५ कोटींची बोली आरसीबीसाठी ठरली फायद्याची, ऑसी ऑलराउंडरने ८ हंगामांची कसर काढली भरुन
वो हसीना बडी सुंदर! हरली देओलचे गोल्फ कोर्सवरील फोटोंनी चाहत्यांना भुरळ; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
होय, तोच माझा प्रेरणास्त्रोत; ‘या’ खेळाडूमुळे भरत दिल्लीविरुद्ध विजयी षटकार मारण्यात झाला यशस्वी