मुंबई | आजपासून ११व्या इंडियन प्रीमियर लीगला सुरूवात होत आहे. शेषराव वानखेडे स्टेडीअम, मुंबई येथे आज उद्धाटन समारंभानंतर एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माची मुंबई इंडियन्स या संघात सलामीचा सामना होणार आहे.
आयपीएल २०१८ मधील विजेत्या संघाला यावेळी तब्बल २० कोटी रुपये मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला १२.५ कोटी रुपये मिळणार आहे.
तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाला ८.५ कोटी रुपये मिळणार आहेत. तेवढीच रक्कम चौथ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघालाही मिळणार आहे.
यावेळी स्पर्धेत एकूण ५६ लीग सामने होणार असून प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी दोन सामने खेळणार आहे. प्रत्येक सामन्यात जिंकणाऱ्या संघाला दोन गुण, सामना जर रद्द झाला तर १ गुण आणि सामना टाय झाला तर सुपर ओवरमध्ये सामना खेळवला जाणार आहे.