बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या दिवशी दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले. मनप्रीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या गुजरात जायंट् संघाचा सामना राकेश कुमार मार्गदर्शन करत असलेल्या हरियाणा स्टीलर्स संघाची झाला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात हरियाणा संघाने आपला दुसरा विजय साजरा केला.
पहिल्या हाफमध्ये हरियाणा संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले. पहिल्या मिनिटापासून त्यांनी गुजरात संघाच्या रेडर आणि डिफेंडर यांना डोके वर काढून दिले नाही. पहिला हाफच्या अखेरीस गुजरात २२-१० असा पिछाडीवर होता. पहिल्या हाफमध्ये हरियाणा संघासाठी अनुभवी रेडर विकास कंडोला याने ८ गुण मिळवले होते. विशेष म्हणजे हरियाणा संघाने गुजरात संघाला दोन वेळा ऑल आउट केले.
दुसऱ्या हाफमध्ये राकेश एचएस याने सलग पाच गुण मिळवताना संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. गुजरातने दुसरा हाफच्या सुरुवातीला हरियाणा संघाला ऑल आउट केले. राकेशने सातत्याने गुण मिळवत, अखेरच्या चार मिनिटात हरियाणा संघाला दुसऱ्यांदा ऑल आउट करत संघाला आघाडी मिळवून दिली.
अखेरचा दीड मिनिटे शिल्लक असताना हरियाणा संघासाठी मीतू याने सुपर रेड करत संघाला ३५-३५ बरोबरी साधून दिली. अखेरच्या रेडमध्ये १९ गुण मिळवणारा राकेश बाद झाल्याने हरियाणा गाडीवर गेला. सामन्यातील अखेरचा रेडमध्ये रवींद्र पहलने नाहक चूक केल्याने गुजरात संघाला ३६-३८ असा पराभव पत्करावा लागला.