बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारी (८ फेब्रुवारी) पहिल्या सामन्यात तमिल थलाइवाज व हरियाणा स्टीलर्स हे संघ आमनेसामने आले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अखेरीस हरियाणाने ३७-२९ असा विजय संपादन केला. आशिष कुमार तीन सुपर रेड मारत सर्वांचे मन जिंकले.
पहिल्या हाफमध्ये जोरदार लढत
तुल्यबळ अशा या लढतीत दोन्ही संघांनी चमकदार खेळ दाखवला. पहिल्या हाफमध्ये हरियाणा संघाकडे १५-१२ अशी आघाडी होती. तमिल थलाइवाजसाठी मनजित व अजित पवार यांनी अनुक्रमे ५ व ३ गुण कमावले होते. तर हरियाणा संघासाठी कर्णधार विकास कंडोलाने सर्वाधिक चार गुणांची कमाई केली होती.
दुसरा हाफही राहिला रोमांचक
दुसऱ्या हाफमध्ये हरियाणा संघाने आक्रमक सुरुवात केली. त्यांनी पहिल्या हाफमध्ये मिळालेली आघाडी वाढवली. मात्र, तमिल थलाइवाजने संघाला ऑल आउट होण्यापासून वाचवले. मात्र, कर्णधार सुरजितने नाहक चूक केल्याने तमिल संघ अखेरच्या चार मिनिटात ऑल-आऊट झाला. ऑल-आऊटनंतर हरियाणा संघाने पाच गुणांची महत्वपूर्ण आघाडी मिळवली होती. आपल्या संयमित खेळाच्या जोरावर त्यांनी ही आघाडी टिकवून ठेवत शानदार विजय मिळवला.