प्रो कबड्डी लीगच्या ८२ व्या सामन्यात पटना पायरेट्स जयपुर पिंक पॅंथर्स हे संघ समोरासमोर आले. स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ असलेला पटना या सामन्यात अगदी निराशाजनक कामगिरी करताना दिसला. मात्र, जयपुरने सगळ्यांच्या अपेक्षांच्या उलट दमदार सांघिक खेळ दाखवत पटनाला मात दिली.
सामन्याच्या सुरुवातीपासून संदीप धूलच्या नेतृत्वातील जयपुर संघाने आक्रमण केले. अर्जुन देशवाल याने रेडमध्ये तर स्वतः कर्णधार संदीपने डिफेन्स मध्ये शानदार कामगिरी केली. अर्जुनने पहिल्या हाफमध्ये आपला सुपर टेन पूर्ण केला. पहिल्या हाफमध्ये जयपुर संघाकडे २५-११ अशी मोठी आघाडी होती.
दुसऱ्या हाफमध्येही जयपूरच्या खेळाडूंचा धडाका कायम राहिला. त्यांनी पटना संघाला अजिबात डोके वर न काढू देता वर्चस्व कायम राखले. डिफेन्स व रेडींगमध्ये जयपूरच्या सर्व खेळाडूंनी उपयुक्त योगदान दिले. अखेरीस मोनू गोयत व गुमान सिंग यांनी काही प्रयत्न करत पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पूर्ण वेळेनंतर सामन्यात जयपुरने ५१-३० असा मोठा विजय मिळवला.