दिनांक २ ऑगस्ट रोजी प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील नववा सामना गुजरात फार्च्युनजायंट्स आणि हरयाणा स्टीलर्स संघात झाला. या सामन्यात दोन्ही संघाना २७-२७ गुण मिळाले आणि हा सामना बरोबरीत सुटला. या मोसमात बरोबरीत सुटलेला हा पहिलाच सामना ठरला. या सामन्यात गुजरातच्या महेंद्र राजपूतने तर हरयाणाच्या सुरिंदर नाडा आणि विकास खंडोला यांनी चांगली कामगिरी केली.
सामन्यातील पहिला गुण गुजरातने मिळवला, पुढील ४ मिनिटे हरयाणा संघ गुणाचे खाते उघडू शकला नाही. त्यांनतर हरियाणा संघाने पहिला गुण मिळवला आणि सामन्यातील गुण ४-१ असे झाले. गुणांचे खाते उघडल्यावर उत्तम डिफेन्सिव्ह खेळाचे प्रदर्शन करत हरियाणा सामन्यात परत आला. परंतु जेव्हा पहिले सत्र संपले तेव्हा गुजरातचा संघ ११-८ असा आघाडीवर होता.
दुसऱ्या सत्रात सामन्याच्या २२व्या मिनिटाला हरियाणा संघाने सामना ११-११ अशा स्थितीत आणला. त्यानंतर पंचानी टाइम आऊट घेतले त्या वेळेस गुजरात संघाने महेंद्र राजपूत याला बदली खेळाडू म्हणून संघात आणले. महेंद्र राजपूत याने गजरात संघाला आघाडी मिळवून दिली आणि त्याला कर्णधार सुकेश हेगडेने उत्तम साथ देत सामना संपायला १० मिनिटे बाकी असताना २२-१४ असे आघाडीवर नेले.
हरियाणा संघाने ३३व्या मिनिटाला सामना २३-२३ असा बरोबरीत आणला आणि नंतर सामन्यात बढत घेतली. सामना कोणत्याही संघाकडे झुकला जाऊ शकणार होता पण ३८व्या मिनिटाला गुजरातचा कर्णधार असणाऱ्या सुकेश हेगडेने गुण मिळवत सामना परत बरोबरीत आणला. पण त्यानंतर हरयाणाच्या रेडर विकास खंडोला याने गुण मिळवत हरयाणा संघाला बढत मिळवून दिली पण गुजरातच्या बाजूने शेवटची रेड करण्यास आलेल्या महेंद्र राजपूतने एक गुण मिळवत सामना २७-२७ असा बरोबरीत आणला. त्यानंतर सामन्याची शेवटची रेड करण्यासाठी आलेल्या विकासाला गुण मिळवता आला नाही आणि हा सामना २७-२७ असा बरोबरीत सुटला.