सिनेसृष्टी आणि खेळ यांचे नाते खूप जवळचे आहे. भारतातील अनेक खेळाडूंचे नाव कित्येकदा सिनेसृष्टीतील तारे आणि तारका यांच्या सोबत जोडलेले आपण पाहतो. अनेक कलाकारांनी खेळाला पाठिंबा म्हणूनकिंवा नवीन व्यवसाय म्हणून खेळाशी नाते जोडलेले आहे.
इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्या सत्रापासून हे नाते खूप वाढत गेले आणि लोकांनी देखील खूप पाठिंबा दिला. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शाहरुख खान, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी यांनी संघ विकत घेतले आणि स्पर्धा खूप यशस्वी झाली आणि भारतामध्ये नंतर सुरु झालेल्या कोणत्याही खेळाच्या लीगमध्ये सिनेकलाकारांचे संघ असणे हे समीकरण होत गेले.
इंडियन प्रीमियर लीगनंतर सर्वात मोठी लीग म्हणून इंडियन सुपर लीग उदयाला आणि त्यात देखील रणबीर कपूर,जॉन अब्राहाम आणि अभिषेक बच्चन यांनी संघ विकत घेतले. सिनेकलाकार आणि खेळ हे समीकरण जुळले की स्पर्धा यशस्वी होणार हे नवीन समीकरण तयार झाले.
प्रो कबड्डी लीगमध्येही हे समीकरण जुळून आले आणि अभिषेक बच्चनने जयपूर पिंक पँथर नावाचा संघ विकत घेतला. स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळीही दिग्गज सिनेकलाकार हजेरी लावतात. अमिताभ बच्चन आणि ह्रितिक रोशन यांनी या आधी अंतिम सामन्यात राष्ट्रगान गायले आहेत. स्पर्धा सुरु असताना खूप कलाकार आपणास स्पर्धेत त्यांच्या आवडत्या संघाला पाठिंबा करायला आलेले दिसतात.
सध्या या क्रीडाविश्वात आणखी एक मालक म्हणून नाव जोडले जाऊ शकते ते म्हणजे अक्षय कुमार. अक्षय कुमारचा आगामी काळात हॉकीवर चित्रपट येतो आहे ज्याचे नाव ‘गोल्ड’असणार आहे. याची कथा भारताचे स्वातंत्र्यानंतरचे हॉकीमधील पहिले गोल्ड मेडल जे ऑलीम्पिक्समध्ये मिळवले यावर आधारित आहे. त्यात अक्षय हा बलबीर सिंग यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर तो एखाद्या संघाचा मालक असावा असे त्याला वाटत होते. म्हणून अक्षय एक संघ विकत घेण्याचा विचार करतो आहे. अगोदर त्याने हॉकीमधील संघ विकत घेण्याचे ठरवले होते, परंतु तो आता प्रो कबड्डीमधील संघाचा संघ मालक होणार आहे.
अक्षय प्रो कबड्डीमधील बेंगॉल वॉरिअर्स संघाचा सहमालक होऊ शकतो. त्याचे तसे बोलणे चालू आहे. बेंगॉल वॉरिअर्स हा संघ प्रो कबड्डी इतिहासात कामगिरीचा विचार केला सर्वात सुमार संघ ठरला आहे. प्रो कबड्डीमध्ये खेळताना या संघाने ५८ सामने खेळला असून त्यातील ३४ सामने हा संघ हरला आहे. बेंगॉल वॉरिअर्स संघाने या वर्षी गुणवान जान कुन ली या कोरियन खेळाडूला संघात कायम केले आहे.
जर अक्षय कुमारने प्रो कबड्डीमध्ये एखादा संघ विकत घेतला तर अन्य अभिनेत्यांप्रमाणे तोही या यादीत सामील होईल. यापूर्वी अभिषेक बच्चन, अल्लू अर्जुन, अल्लू अरविंद आणि रवी चरण तेजा यांनी प्रो कबड्डीमध्ये संघ विकत घेतले आहेत.