हरियाणा संघाचा डिफेन्स मधील मजबूत खांब आणि हरियाणा संघाचा लेफ्ट कॉर्नर आणि अँकेल होल्डसाठी प्रसिद्ध असणारा सुरिंदर नाडा याला हरियाणा संघाचा पहिलावहिला कर्णधार होण्याचा मान मिळाला आहे. यंदाच्या वर्षी प्रो कबड्डीमध्ये चार नवीन संघ सहभागी झाले आहेत, त्यापैकी हरियाणा स्टीलर्स हा संघ आहे.
सुरिंदर नाडाने आपल्या डिफेन्सिव्ह खेळाने पहिले तीन मोसम यु मुंबा संघासाठी नाव कमावले. त्यानंतर चौथ्या मोसमात सुरिंदर नाडा बेंगलुरू बुल्स संघासाठी खेळला. या वर्षी झालेल्या बोली प्रक्रियेत हरयाणा संघाने ४६.५ लाख बोली लावून सुरिंदर नाडाला संघात सामील करून घेतले.
सुरिंदर नाडाचा सहकारी म्हणून त्याचा डिफेन्समधील जोडीदार मोहित चिल्लरहा देखील हरयाणा संघात आहे. संघात रेडींगसाठी वजीर सिंग सोबत सुरजीत सिंग आहे. प्रो कबड्डीमधील बाकी संघात पूर्णवेळ डिफेंडर म्हणून खेळणाऱ्या खेळाडूंचा वणवा आहे. त्यात हरियाणा संघाकडे चांगले डिफेंडर्स आहेत. त्यामुळे पुणेरी पलटण संघाचा पहिला कर्णधार असणारा वजीर सिंग याला कर्णधारपदाचा अनुभव असताना देखील सुरिंदर नाडा याला कर्णधारपद दिले गेले असावे.
सुरिंदर नाडा हा प्रो कबड्डीमधील इतिहासात यशस्वी पाच डिफेंडरमधील एक डिफेंडर आहे. त्याने प्रो कबड्डीमध्ये खेळलेल्या ४९ सामन्यात खेळताना १५६ गुण मिळवले आहेत त्यातील १८ गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले असून १३८ गुण डिफेन्समध्ये मिळवले आहेत. त्यात त्याने २५४ पकडीमध्ये संघासाठी मदत केली आहे त्यातील १२८ पकडी यशस्वी झाल्या आहेत तर १२६ अयशस्वी पकडीमध्ये त्याचा हातभार आहे.