युवा नितीन तोमरला पदार्पणातच संघाला चषक जिंकून देण्याची सुर्वण संधी !
प्रो कबड्डी चा पाचवा मोसम लवकरच सुरु होणार आहे आणि ४ नवीन संघ सामील झाल्यामुळे हा मोसम धमाकेदार होणार हे नक्की. या महिन्याच्या अखेरीस २८ जुलै पासून सामने सुरु होतील. भारतातील दहा राज्यांमध्ये हे सामने होणार आहेत. हा मोसम तीन महिन्यांहून अधिक काळ चालणार असून १४० हून अधिक सामने होणार आहेत आणि अंतिम सामना २८ ऑक्टोबरला होईल.
या मोसमाच्या आधी जी लिलाव प्रक्रिया झाली त्यात जुन्या संघानी आपापल्या संघातील प्रत्येकी एक खेळाडू राखून ठेवला होता. तर नवीन संघाना सर्वप्रथम एक खेळाडू निवडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर मुख्य लिलावामध्ये उत्तर प्रदेश योद्धाज संघाने नितीन तोमरला तब्बल ९३ लाख रुपये मोजत आपल्या संघात सामील करून घेतले होते.
नितीन तोमरने तिसऱ्या पर्वात बंगालकडून अप्रतिम रेडिंग कौशल्याचे प्रदर्शन केले होते. पण त्यानंतर दुखापतीमुळे चौथ्या पर्वात त्याला पुणेरी पलटणकडून चांगला खेळ करता आला नाही. तरीही, त्याला भारतीय संघात स्थान मिळाले होते आणि त्या संघाने कबड्डी वर्ल्डकप ही जिंकला होता. म्हणूनच की काय आता तोमरवर उत्तर प्रदेश संघाच्या कर्णधार पदाची ही जबाबदारी देण्यात आली आहे.
एकंदरीत, उत्तरप्रदेशचा संघ पदार्पणाच्या मोसमातच चांगला खेळ करेल अशी अपेक्षा आहे.