प्रो कबड्डीचा पाचवा मोसम सुरु होण्यापूर्वीच त्याची मोठी चर्चा आहे. या मोसमात कोणते नवीन संघ येणार, ह्या संघाचं कोणतं होम ग्राउंड कोणतं, या संघात कोणते खेळाडू असणार याची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु आहे. असाच नवीन चार संघांपैकी एक संघ म्हणजे युपी योद्धाजचा संघ. या मोसमात सर्वात महागडा खेळाडू ठरलेला नितीन तोमर या संघात आहे. त्याला तब्बल ९३ लाखांची बोली लावून संघात विकत घेण्यात आले आहे.
युपी योद्धाज संघाची खरी ताकद ही रेडींग आहे. या संघाची ही जमेची बाजू आहे. त्यांच्याकडे कर्णधार नितीन तोमर सारखा दिग्गज रेडर असून त्याला तेवढीच जबदस्त साथ देऊ शकेल असा रिशांक देवाडीगा आहे. रिशांकने यु मुंबा संघाकडून पाठीमागचा मोसम गाजवला आहे. रिशांकची खासियत म्हणजे तो डू ऑर डाय रेड स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. महेश गौड आणि सुरिंदर सिंग हे बाकीचे दोन रेडर आहेत जे संघाला रेडींगमध्ये मजबुती देतील.
युपी संघात जीवा कुमारसारखा एक खूप अनुभवी डिफेंडर आहे जो या पूर्ण नवख्या संघाला जबाबदारीने पुढे घेउन जाईल. हादी ताजीक हा इराणी डिफेंडर आहे जो राईट कॉर्नरवर उत्तम खेळ करू शकतो. संघाची मजबूत बाजू म्हणजे संघाकडे प्रो कबड्डीमध्ये खेळणाऱ्या ऑलराऊंडर खेळाडूंपैकी उत्तम ऑलराऊंडर आहे तो म्हणजे राजेश नरवाल. राजेशने मागील चार मोसम जयपूर पिंक पँथर संघासाठी खेळला होता. त्याने प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली होती आणि मागील चौथ्या मोसमात संघाला अंतिम सामन्यात पोहचवले होते.
युपी योद्धाज संघ प्रो कबड्डीमधील काही मोजक्या संघातील एक संघ आहे जो या स्पर्धेचा प्रबळ दावेदार समजला जातो.
असा असेल युपी योद्धाजचा संभाव्य संघ –
१ नितीन तोमर- (कर्णधार) रेडर
२ रिशांक देवाडिगा -रेडर
३ महेश गौड -रेडर
४ जीवा कुमार-लेफ्ट कॉर्नर
५ हाडी ताजीक -राईट कॉर्नर
६ नितेश कुमार- ऑलराऊंडर
७ राजेश नरवाल – ऑलराऊंडर