प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील १०३ वा सामना यु मुंबा व पटना पायरेट्स या तुल्यबळ संघात खेळला गेला. रेडर्सचे वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात प्रेक्षकांना हायस्कोरींग सामना पाहायला मिळाला. अखेरचा रेडपर्यंत रोमांचक राहिलेल्या या सामन्यात अखेरीस पटना पायरेट्सने विजय संपादन केला.
पहिल्या हाफमध्ये उडाला धुरळा
या सामन्याची सुरुवात पटना संघाने अत्यंत आक्रमक केली. पटनाने ८-१ अशी सुरुवात करत मुंबईला बॅकफूटवर ढकलले होते. मात्र, अनुभवी रेडर अभिषेक याने संघाला संकटातून बाहेर काढले. त्यांनी पटनाला ऑल आऊट करत सामना बरोबरीत आणला. मात्र, पहिल्या हाफच्या १७ व्या मिनिटाला पटनासाठी सचिनने पाच गुणांची रेड करत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये पटनाकडे २६-१८ अशी आघाडी होती.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीस पटना पुन्हा आक्रमण करण्यास सज्ज झाला होता. मात्र, मुंबईसाठी अभिषेकने सातत्याने एकेरी दुहेरी गुण घेतले. त्याला दुसरी कोणाची साथ न मिळाल्याने पटनाची आघाडी कधीही आठ गुणांच्या खाली आली नाही. पूर्ण वेळेनंतर पटना संघाने ४७-३६ असा विजय मिळवला.






