बंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या ४७ व्या सामन्यात यु मुंबा व पटना पायरेट्स हे संघ आमनेसामने आले. चाहत्यांना तुल्यबळ लढतीची अपेक्षा असताना पटना पायरेट्सने यु मुंबाला अजिबात डोके वर न काढू देता एकतर्फी सामन्यात लोळवले.
या सामन्यात पटना पायरेट्सने पहिल्या मिनिटापासून वर्चस्व गाजवले. कर्णधार प्रशांत, सचिन व मोनू गोयत त्यांनी रेडींग तर नीरज याने डिफेन्समध्ये शानदार कामगिरी करत पहिल्या हाफमध्ये १९-९ अशी मोठी आघाडी घेतली.
दुसऱ्या हाफमध्येही परिस्थिती फारशी बदलली नाही. मुंबईसाठी अभिषेक सिंग वगळता इतर कोणीही सातत्याने गुण घेण्यात यशस्वी ठरले नाही. पटना संघाने शेवटच्या काही मिनिटांत खेळाची गती कमी केली. तसेच एकेरी दुहेरी गुण घेत त्यांनी आपली आघाडी वाढवत नेली. अखेरीस पटना हा सामना ४३-२३ अशा मोठ्या फरकाने जिंकण्यात यशस्वी ठरला.