प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात रविवारी (20 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. नॉदर्न डर्बी म्हणून खेळल्या गेलेल्या हरियाणा स्टीलर्स व दबंग दिल्ली यांच्यातील सामन्यात दबंग दिल्लीने 42-30 असा विजय मिळवला. तर, अखेरच्य रेडपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणने बेंगलोर बुल्सला 35-33 असे पराभूत करत गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली.
.@DabangDelhiKC & @PuneriPaltan stamped their authority on the mat tonight!
Here's how the league table is shaping up ????#vivoProKabaddi #FantasticPanga #HSvDEL #BLRvPUN pic.twitter.com/dk2GHw0NT8
— ProKabaddi (@ProKabaddi) November 20, 2022
हैदराबाद येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत गुणतालिकेत पहिल्या व दुसऱ्या स्थानी असलेल्या बेंगलोर व पुणे या दरम्यानच्या सामन्यात प्रेक्षकांना जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. पुणेने पहिल्याच हाफमध्ये आक्रमक खेळ करत 20-10 अशी आघाडी घेतली. मोहित गोयतने शानदार खेळ करत पुण्याच्या आक्रमणाचे नेतृत्व केले. एकवेळ पुणे संघ 32-20 अशा जबरदस्त आघाडीवर होता. मात्र, त्यानंतर बेंगलोर संघाने तुफानी कामगिरी करत सलग 11 गुण घेत सामन्यात पुनरागमन केले. अखेरचे काही सेकंद शिल्लक असताना 33-33 असा सामना बरोबरीत असताना अस्लम इनामदारने अखेरच्या रेडमध्ये दोन गुण घेत पुणे संघाला विजयी केले.
दिवसातील पहिल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स व दबंग दिल्ली या दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवला. मात्र, मागील सामन्यात विजय मिळवून पुन्हा विजय मार्गावर परतलेल्या दिल्लीने आपला तोच खेळ कायम राखला. नवीन कुमारने 15 व आशू मलिकने 10 गुण घेत दिल्लीच्या विजयात सर्वाधिक योगदान दिले.