प्रो कबड्डीचा पाचवा मोसम आणि भव्यता हे समीकरणच बनले आहे. पाचव्या मोसमात चार नवीन संघ दाखल करत भारतात सर्वाधिक संघ खेळणारी ही स्पर्धा ठरली. या स्पर्धेत ११ राज्यातील १२ संघ एकमेकांसमोर उभे आहेत. या स्पर्धेत एकूण १३८ सामने होणार आहेत, जे की भारतामध्ये खेळल्या जाणाऱ्या कोणत्याही इतर स्पर्धेतील सामन्यांच्या तुलनेत अधिक आहेत.
प्रो कबड्डीचा पाचवा मोसम हा तीन महिने चालणार आहे. हा इतका मोठा मोसम असल्याने प्रेक्षक या मोसमाकडे पाठ फिरवातील का असे अनेकांना वाटले होते. यावेळी स्पर्धेतील सामन्यांचे स्वरूपही थोडे वेगळे असल्याने प्रेक्षकांना ते पचणार नाही अश्या नाकारात्मक गोष्टी बोलल्या जात होत्या. पण या सर्व बाबी गौण ठरवत प्रेक्षकांनी या स्पर्धेला उदंड पाठिंबा दिला. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ५ कोटी टेलेव्हीजन सेटवर सामना पहिला गेला.
मागीलवर्षीच्या तुलनेत सामना पाहणाऱ्यांच्या प्रेक्षकसंख्येत प्रचंड वाढ झाली असून गणिती आकडा मांडायचा झाला तर ती वाढ ५९ टक्के इतकी होती. या आकडेवारीचे राज्यवार वर्गीकरणही उपलब्ध झाले आहे. मागील मोसमाच्या तुलनेत सर्वाधिक प्रेक्षकवाढही कर्नाटक राज्यात झाली असून त्यात १३७ टक्के इतकी वाढ झाली आहे. त्यानंतर अनुक्रमे आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो. आंध्रप्रेदेशच्या प्रेक्षकसंख्येत ४८ टक्के इतकी वाढ झाली तर महाराष्ट्रात ही वाढ २२ टक्के झाली.