बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ६३ वा सामना यु मुंबा व गुजरात जायंट्स संघांमध्ये खेळला गेला. पहिला हाफमध्ये कमालीचा संथ झालेला हा सामना दुसऱ्या हाफमध्ये काहीसा वेगवान झाला. या रोमांचक सामन्यात अखेरीस प्रेक्षकांना टाय पाहण्यास मिळाला.
गुणतालिकेत बॉटममध्ये असलेले हे दोन्ही संघ मैदानात उतरले तेव्हा चाहत्यांना चाहत्यांना पहिल्या मिनिटापासून सामना वेगवान होईल अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्या हाफमध्ये चाहत्यांची निराशा झाली. मुंबईसाठी अजिंक्य कापरे व अजित यांनी प्रत्येकी तीन गुण मिळवले. दुसरीकडे, अजयच्या पाच गुणांसह गुजरातने पहिल्या हाफमध्ये १३-१० अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी गुण घेण्यास सुरुवात केली. मात्र, गुजरात संघाची आघाडी कमी होत नव्हती. सामना संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना यु मुंबाचा राईट कॉर्नर रिंकू याने सुपर टॅकल करत सामना बरोबरीत आणला. यासह त्याने स्वतःचा हाय फाईव पूर्ण केला. मात्र, अजय व हादी ओस्तरोक यांनी सलग गुण घेत मुंबईला पुन्हा पिछाडीवर टाकले. अभिषेक सिंग याने गुजरातचा कर्णधार सुनील याला बाद करत मुंबईला पुन्हा एका गुणाच्या आघाडीवर नेले. अखेरच्या मिनिटात गुजरातसाठी अजयने एक गुण घेत सामना बरोबरीत आणला. सामन्यातील अखेरच्या रेडमध्ये मुंबई एकही गुण मिळवून न शकल्याने सामना २४-२४ असा टाय झाला.