तेलगू टायटन्स हा प्रो कबड्डीमधील एक खूप लोकप्रिय संघ आहे. या संघाकडे प्रो कबड्डी मधील सर्वात यशस्वी रेडर राहुल चौधरी आहे तर भारताचा माजी कर्णधार राकेश कुमार ही या संघासोबत आहे शिवाय डू ऑर डाय रेडसाठी संघात निलेश साळुंके आहे.
संघात डिफेंडर म्हणून रोहित राणा आहे. तेलगू टायटन्स संघाकडे तर स्वतः रजनीकांत देखील आहे. या संघाकडे नाही ती म्हणजे या स्पर्धेची चकाकणारी ट्रॉफी ज्यावर लिहलेले असेल की ‘विजेता तेलगू टायटन्स.’
तेलगू टायटन्स संघाकडे नेहमीच चांगले खेळाडू होते पण त्यांना अंतिम सामन्यापर्यंत पोहचता आलेले नाही. संघाने दोनवेळेस सेमी फायनलमध्ये प्रवेश केला पण तेलगू टायटन्स संघाला अंतिम सामन्यात प्रवेश करता आलेला नाही. पहिल्या मोसमात राहुलने तुफानी रेडींगच्या जोरावर संघाला सेमी फायनलमध्ये नेले होते आणि मागील मोसमात देखील सेमीफायनलपर्यंत संघ पोहचला होता. परंतु अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यात संघ अपयशी ठरला.
पहिल्या मोसमानंतर राहुल संघाचा कर्णधार झाला खरा पण त्याला कर्णधार पदाचे दडपण जास्त आले आणि त्याचा खेळ उंचावत गेला नाही. त्यावेळी संघात त्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोणताही अनुभवी खेळाडू नव्हता पण आता संघात राकेश कुमार आहे जो अनुभवाची खाण असून त्याने सलग तीन आशियाई खेळामध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक जिकून दिले आहे.
यावर्षी आपणाला राहुलचा तडफदार खेळ आणि राकेशच्या अनुभवी खेळ एकत्र पाहायला मिळणार आहे. या दोन खेळाडूंनी अपेक्षाप्रमाणे जर खेळ केला तर हा संघ नक्कीच अंतिम सामन्यापर्यंत मजल मारेल.
असा असेल तेलगू टायटन्सचा संभाव्य संघ
१ राहुल चौधरी -(कर्णधार) रेडर
२ राकेश कुमार -रेडर
३ निलेश साळुंके -रेडर
४ रोहित राणा -लेफ्ट कव्हर
५ अमितसिंग चिल्लर -लेफ्ट कॉर्नर
६ सोमबीर -राइट कॉर्नर
७ फरहाद राहिमी मिलाघरदन-राइट कव्हर