कोविड-१९ महामारीमुळे इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम स्थगित करण्यात आला आहे. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक तयार केले आहे. जून महिन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध साउथम्पटन येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
या कालावधीत मिळालेल्या रिकाम्या वेळेत अर्थात जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. परंतु या दौऱ्यासाठी बीसीसीआयने विशेष योजना आखली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा यांना श्रीलंकाविरुद्ध न खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
अशात भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल?, सलामीवीराची भूमिका कोण निभावेल?, गोलंदाजी विभागात कोणाला संधी मिळेल?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सलामीवीर आणि कर्णधार
ईएसपीएन क्रिकइंफोने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकाविरुद्धच्या क्रिकेट मालिकांसाठी अधिकतर युवा खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थित भारताचा अनुभवी क्रिकेटपटू शिखर धवन याच्या हाती संघाच्या नेतृत्त्वाची सुत्रे दिली जाऊ शकतात. त्याने यापुर्वी आशिया चषकात भारताच्या उपकर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. याबरोबरच फॉर्मात असलेला हा फलंदाज सलामीवीराच्याही भूमिकेत दिसून येईल. धवनबरोबर युवा सलामीवीर पृथ्वी शॉला संधी दिली जाऊ शकते. जेणेकरुन तो त्याचा फॉर्म टिकवून ठेवू शकेल. याबरोबरच त्याला भारतीय संघात पुनरागमाचीही संधी मिळेल.
तसेच आयपीएलमधील प्रतिभाशाली सलामीवीर देवदत्त पड्डीकल आणि ऋतुराज गायकवाड यांनाही पर्याय म्हणून संघात स्थान मिळू शकते.
मधल्या फळीतील फलंदाज
मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, संजू सॅमसन असे पर्याय भारतीय संघासमोर आहेत. हार्दिकला अष्टपैलू म्हणून संघात जागा दिली जाऊ शकते. त्याचे मधल्या फळीत खेळणे जवळपास निश्चित असल्याप्रमाणे आहे. त्याच्याबरोबर सूर्यकुमार यादवलाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. इतर फलंदाजांमध्ये कोणाला संधी मिळेल हे पाहावे लागणार आहे.
गोलंदाजी विभाग
फिरकी गोलंदाजी विभागात युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृणाल पंड्या, वरुण चक्रवर्ती, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, रवि बिश्नोई असे एकाहून एक सरस पर्याय भारतीय संघाजवळ आहेत. आयपीएलमध्ये आपल्या दमदार प्रदर्शनाचा ठसा उमटवणाऱ्या या फिरकीपटूंमध्ये कोणाला संधी मिळेल हे पाहावे लागेल. याखेरीज चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचे स्थान जवळपास ठरल्यात जमा आहे. मागील काही काळापासून दुर्लक्षित झालेल्या या शिलेदाराला पुन्हा आजमावण्याची ही सुवर्णसंधी असणार आहे.
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला इंग्लंड दौर्यात संधी मिळाली नाही. त्यामुळे लयीत असलेल्या भुवनेश्वरचे श्रीलंका दौऱ्यावर जाणे जवळपास नक्की आहे. त्याच्याव्यतिरिक्त आयपीएल गाजवणारे दीपक चाहर, नवदीप सैनी, टी नटराजन यांनाही वेगवान गोलंदाजी विभागात संधी दिली जाऊ शकते. तसेच कार्तिक त्यागी, कमलेश नागरकोटी, ईशान पोरेल आणि शिवम मावी या गोलंदाजांचेही पर्याय भारताकडे आहेत.
वनडे आणि टी२० मालिकेचे आयोजन
भारताचा श्रीलंका दौरा केवळ मर्यादित षटकांच्या मालिकांचा असून यात फक्त वनडे आणि टी२० मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार या दौर्यात सर्वप्रथम वनडे मालिका खेळवली जाईल. १३ जुलै रोजी वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. त्यानंतर १६ आणि १९ जुलै रोजी वनडे मालिकेचे उर्वरित दोन सामने खेळवले जातील.
वनडे मालिका संपल्यानंतर टी२० मालिकेची सुरुवात होईल. या मालिकेचा पहिला सामना २२ जुलै रोजी खेळवला जाईल. तर उर्वरित दोन सामने अनुक्रमे २४ आणि २७ जुलै रोजी खेळवले जातील. अशा प्रकारे तीन वनडे सामने आणि तीन टी२० सामने खेळवण्यात येतील.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला १८चा खतरा; मागील ६ वर्षे नडलेल्या या अनलकी तारखेला विराटसेना यंदा बनवणार लकी?
विरोधकांची चिंता शिगेला; आगामी टी२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा ‘हा’ दिग्गज गोलंदाज करणार पुनरागमन!