संपुर्ण नाव- चेतन शर्मा
जन्मतारिख- 3 जानेवारी, 1966
जन्मस्थळ- लुधियाना, पंजाब
मुख्य संघ- भारत, बंगाल आणि हरियाणा
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 17 ते 22 ऑक्टोबर, 1984, ठिकाण – लाहोर
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 7 डिसेंबर, 1983, ठिकाण – जमशेदपूर
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 23, धावा- 396, शतके- 0, सर्वोत्तम कामगिरी – 54 धावा
गोलंदाजी- सामने- 23, विकेट्स- 61, सर्वोत्तम कामगिरी- 6/58
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 65, धावा- 456, शतके- 1, सर्वोत्तम कामगिरी – नाबाद 101 धावा
गोलंदाजी- सामने- 65, विकेट्स- 67, सर्वोत्तम कामगिरी- 3/22
थोडक्यात माहिती-
-चेतन शर्मा यांनी चंदीगडचे प्रसिद्ध प्रशिक्षक देश प्रेम आझाद यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे. आझाद यांनी कपिल देव तसेच योगराज सिंग यांनाही मार्गदर्शन केले होते.
-चेतन हे भारताचे फलंदाज यशपाल शर्मा यांचे भाचे आहेत. या भाचा-मामाच्या जोडीने 2 वनडे सामने एकत्र खेळले होते. त्यातील 1984-85चा इंग्लंडविरुद्धचा सामन्यात चेतन यांच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा फलंदाज ग्रिम फोलर यांचा झेल यशपाल यांनी पकडला होता.
-चेतन यांना एका नकोस्या गोष्टीसाठी आठवले जाते. ती अशी की, 1986च्या शारजाह येथील ऑस्ट्रल-आशिया चषक अंतिम सामन्यात पाकिस्तानचे फलंदाज जावेद मियाँदाद यांनी सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारत सामना जिंकला होता. यावेळी चेतन शर्मा गोलंदाजी करत होते. त्यांच्या गोलंदाजीमुळे भारताने सामना गमावला होता, म्हणून त्यांना आठवले जाते.
-यानंतर, चेतन यांनी 1986च्या इंग्लंड दौऱ्यावर भारताला कसोटी मालिका जिंकवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. लॉर्ड्स येथे झालेल्या या सामन्यात त्यांनी पहिल्या डावात 64 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
-यानंतर त्याचवर्षात त्यांनी बर्मिंगहम येथील कसोटीत 10 विकेट्स घेतल्या होत्या. तो उन्हाळी हंगाम त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला होता. त्यांनी या हंगामात एकूण 16 विकेट्स घेतल्या होत्या.
-नागपूर येथील 1987च्या विश्वचषकात चेतन यांनी कारकिर्दीतील पहिली हॅटट्रिक घेतली होती. ही हॅट्रिक त्यांनी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामन्यात घेतली होती. न्यूझीलंडचे फलंदाज केन रूदरफोर्ड, आयन स्मिथ आणि इव्हेन चॅटफिल्ड यांच्या सलग 3 विकेट्स घेत हॅटट्रीक घेतली होती. त्यावेळी ते विश्वचषकात हॅट्रिक घेणारे जगातील पहिले गोलंदाज होते.
-त्याकाळात तेव्हा असे पहिल्यांदाच घडले होते की वनडेतील एकाच सामन्यात 2 क्रिकेटपटूंना सलामीवीर पुरस्कार देण्यात आला होता. विश्वचषकातील चेतन यांच्या हॅटट्रीकमुळे त्यांना सामनावीर पुरस्कार मिळाला होता. पण, या सामन्यात सुनिल गावसकर यांच्या शतकी फलंदाजी कामगिरीमुळे त्यांनाही सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
-चेतन यांच्यासाठी 1989मधील इंग्लंडविरुद्धचा नेहरू चषक अविस्मरणीय ठरला होता. त्यांनी स्पर्धेतील वनडे सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत 96 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ह्या त्यांच्या पहिल्या आणि शेवटच्या 50हून जास्त धावा होत्या.
-देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी सर्व सामने हरियाणाकडून खेळले होते. पण केवळ 1996मधील एक सामना जो त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता तो त्यांनी बंगाल संघाकडून खेळला होता.
-निवृत्तीनंतर त्यांनी समालोचन केले आहे. तसेच, 2004मध्ये त्यांनी हरियाणातील पंचकुला येथे त्यांची स्वत:ची क्रिकेट अकॅडमी सुरु केली.
-2009मध्ये चेतन यांनी बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) तिकिटावर फरीदाबादमधून लोकसभा निवडणूक लढविली होती.