संपुर्ण नाव- किरण शंकर मोरे
जन्मतारिख- 4 सप्टेंबर, 1962
जन्मस्थळ- बडोदा, गुजरात
मुख्य संघ- भारत आणि बडोदा
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
क्षेत्ररक्षणाची जागा – यष्टीरक्षण
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 5 ते 10 जून, 1986, ठिकाण – लॉर्ड्स
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 5 डिसेंबर, 1984, ठिकाण – पुणे
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 49, धावा- 1285, शतके- 0, सर्वोत्तम कामगिरी – 73 धावा
यष्टीरक्षण – झेल – 110, यष्टीचीत – 20
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 94, धावा- 563, शतके- 0, सर्वोत्तम कामगिरी – नाबाद 42 धावा
यष्टीरक्षण – झेल – 63, यष्टीचीत -27
थोडक्यात माहिती-
-भारतीय यशस्वी यष्टीरक्षकांच्या यादीत किरण मोरे यांना गणले जाते. त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण चमत्कारापेक्षा कमी नव्हते. त्यांना आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सतत चंद्रकांत पंडित, सदानंद विश्वनाथन, सय्यद किरमानी अश्या यष्टीरक्षकांसह स्पर्धा करावी लागत असे.
-यासाठी त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे ते फलंदाजी आणि यष्टीरक्षणात तरबेज झाले होते. मोरे यांनी 1984 ते 1993च्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत यष्टीमागे दमदार कामगिरी केली होती.
-त्यांनी 49 कसोटी सामन्यात यष्टीमागील 130 विकेट्स (110 झेल, 20 यष्टीचीत) घेत 1285 धावा केल्या होत्या. यात 7 अर्धशतकांचा समावेश होता. तर वनडेत त्यांनी 94 सामन्यात यष्टीमागील 90 विकेट्स (63 झेल, 27 यष्टीचीत) घेतल्या होत्या.
-भारतीय संघात पदार्पण करण्यापुर्वी मोरे यांनी त्यांच्या यष्टीरक्षणाच्या शैलीत सुधार करण्यासाठी 1982-83मध्ये उत्तर लॅंकशायर लीग खेळली होती.
-त्याचवर्षी (1982-83) मोरे यांना वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीत सय्यद किरमानी यांच्या बदल्यात संघात घेण्यात आले होते. मात्र, त्या कसोटी मालिकेत त्यांना एकदाही खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
-मोरे यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट फलंदाजी प्रदर्शन त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये केले होते. त्यांनी बडोदाकडून खेळलेल्या देशांतर्गत चॅम्पीयनशीपच्या उपांत्य फेरीत नाबाद 153 आणि नाबाद 181 धावांची मोठी खेळी केली होती.
-मोरे यांना 1986 सालच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांच्या यष्टीमागील कामगिरीने आणि फलंदाजीने एका रात्रीत स्टार बनवले होते. त्यांनी या मालिकेत यष्टीमागे 16 झेल पकडले होते आणि 52च्या सरासरीने 156 धावा केल्या होत्या. त्यांची फलंदाजी सरासरी ही त्या मालिकेतील दुसऱ्या क्रमांकाची सरासरी होती.
-यानंतर दोन वर्षांनी चेन्नईतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत त्यांनी एकाच सामन्यात यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम केला होता. भारतीय गोलंदाज नरेंदर हिरवानी यांच्या गोलंदाजीच्या मदतीने मोरे यांनी यष्टीमागील 6 विकेट्स घेत हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता.
-एवढेच नाही तर, मोरे यांना एका नकोश्या गोष्टीसाठीही आठवले जाते. ती अशी की, 1990च्या लॉर्ड्स येथील कसोटीत त्यांनी इंग्लंडचे फलंदाज ग्रॅहम गूच यांचा महत्त्वाचा झेल पकडता आला नव्हता.
-क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती घेतल्यानंतर मोरे यांनी 2000-2006 पर्यंत बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्षपद सांभाळले होते. गांगुली आणि चॅपल यांच्या वादादरम्यान मोरे यांच्या गांगुलीला कर्णधारपदावरून हटवण्याच्या निर्णयाने त्यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
-2007 साली त्यांची इंडियन क्रिकेट लीगच्या कार्यकारी संचालकपदी निवड झाली होती. पण त्यामुळे बीसीसीआयने त्यांच्यासह, कपिल देव आणि काही अन्य खेळाडूंवर बंदी घातली होती. 2012 नंतर ही बंदी उठवली.
-ते आता गुजरातमधील बडोदा येथील किरण मोरे-अलेम्बिक क्रिकेट अकॅडमी चालवतात.