मुंबई।| हिरो इंडियन सुपर लीगच्या पाचव्या मोसमातील महाराष्ट्र डर्बीचा पहिला सामना येऊन ठेपला आहे. यजमान मुंबई सिटी एफसी शेजारील पुणे सिटी एफसीविरुद्ध आज (19 ऑक्टोबर) मैदानात उतरेल. मुंबई फुटबॉल एरिनावरील या लढतीत दोन्ही संघ विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरतील.
विशेष म्हणजे पुणे सिटीचा याआधीचा विजय गेल्या लीगमधील याच लढतीत झाला होता. तेव्हा पुण्याने घरच्या मैदानावर 1-0 असा विजय मिळविला होता. मग मुंबईत येऊन त्यांनी 2-0 अशी बाजी मारली होती. मुख्य म्हणजे मुंबईला त्यांचे पुण्याविरुद्धचे घरच्या मैदानावरील मागील तीन सामने जिंकता आलेले नाहीत.
मुंबईला पहिल्या दोन सामन्यांत जमशेदपूरविरुद्ध पराभव, तर केरळा ब्लास्टर्सविरुद्ध बरोबरी अशीच कामगिरी करता आलेली आहे. त्यामुळे जोर्गे कॉस्टा यांना परदेशी खेळाडूंकडून सरस खेळाची अपेक्षा असेल.
आशावादी कॉस्टा म्हणाले की, “आम्हाला हे निकाल अपेक्षित नव्हते. त्यातही आम्ही पहिला सामना घरच्या मैदानावर खेळत होतो, पण आम्ही चांगला सराव करीत आहोत. संघाच्या क्षमतेवरील आमचा विश्वास कायम आहे. शुक्रवारी आम्ही सरस कामगिरी करू शकू आणि तीन गुण जिंकू शकू अशी आशा आहे.”
पुण्याची आघाडी फळी मार्सेलिनो परतल्यामुळे भेदक झाली आहे. अशावेळी पुण्याला रोखायचे असेल तर पाऊलो मॅचादो, अरनॉल्ड इसोक आणि रफाएल बॅस्तोस यांना मोलाची भूमिका पार पाडावी लागेल.
कोस्टा यांनी यास पुष्टी देताना सांगितले की, पुण्याचा संघ फार चांगला आहे. आम्ही नव्या संघाची बांधणी करीत आहोत. पुण्याचा संघ मागील मोसमाच्या तुलनेत कायम आहे. ही पुण्याच्या जमेची बाजू असेल. त्यांचे प्रशिक्षकही चांगले आहेत. हा सामना आमच्यासाठी अवघड असेल.
मार्सेलिनो हा अनुभवी खेळाडू आहे. वैयक्तिक पातळीवर चमकदार गुणवत्ता आणि सातत्याने गोल करण्याच्या क्षमतेमुळे तो कोणत्याही बचाव फळीसमोर आव्हान निर्माण करू शकतो. यास एमिलीयानो अल्फारो याचे अथक प्रयत्न आणि दिएगो कार्लोसच्या शैलीची जोड मिळते तेव्हा पुण्याचे आक्रमण अत्यंत भेदक बनते.
मार्सेलिनो आणि अल्फारो ही जोडी नक्कीच धोकादायक आहे यात शंका नाही. गेल्या मोसमात पुण्याचे 31 पैकी 17 गोल त्यांनी केले होते. हे प्रमाण तब्बल 54.84 इतके होते.
मार्सेलिनोला निलंबनामुळे पुणे सिटीचा पहिला सामना खेळता आला नाही. त्याची उणीव पुण्याला फारच जाणवली. त्यांना निर्णायक क्षेत्रात आक्रमण करताना झगडावे लागले. त्यामुळे दिल्ली डायनॅमोजने त्यांच्यावर वर्चस्व राखले.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 31 वर्षांच्या मार्सेलिनोने गोल केल्यावर पुणे सिटीने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. पुण्याचे प्रशिक्षक मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांनाही शुक्रवारी विजय मिळण्याची अपेक्षा आहे.
“हा आमचा दुसरा सामना आहे. जमशेदपूरविरुद्ध मुंबईने येथील पहिला सामना गमावला हे आम्हाला माहित आहे, पण नंतर केरळा ब्लास्टर्सविरुद्ध ते चांगले खेळले. जमशेदपूरविरुद्धही पूर्वार्धात त्यांचा खेळ चांगला झाला होता, पण मुंबईची समस्या काय आहे याची मला कल्पना आहे आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू,” असे मिग्युएल म्हणाले.
यजमान मुंबईच्या बचाव फळीची कामगिरी सामान्यच झाली आहे. यास केवळ ल्युचीयन गोऐन अपवाद आहे. त्याच्यावरच मार्सेलिनीयो आणि कंपनीला रोखण्याची मदार असेल.
ही लढत म्हणजे मुंबईचा बचाव विरुद्ध पुण्याचे आक्रमण अशी असेल. यात कोस्टा यांचा व्यावहारिक दृष्टिकोन मिग्युएल पोर्तुगाल यांच्या वर्चस्वाच्या शैलीविरुद्ध पणास लागेल. दोन्ही संघांना मोसमातील पहिल्या विजयाची प्रतिक्षा असल्यामुळे महा डर्बीत प्रेक्षकांसह खेळाडू आणि प्रशिक्षकांचे खूप काही पणास लागलेले असेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–सलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरु
–ISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक