पुणे: पुणे शहर संघाने पुणे जिल्हा मिनी फुटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद मिळवले.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत पुणे शहर संघाने सातारा संघावर १-०ने मात केली. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला.
लढतीच्या दहाव्या मिनिटाला साहील कदमने गोल करून पुणे शहर संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर सातारा संघाने बरोबरी साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, त्यात त्या संघाला यश आले नाही आणि १-० अशी आघाडी शेवटपर्यंत कायम राखून पुणे शहर संघाने जेतेपद मिळवले.
मुलींच्या गटात मुंबई उपनगर विजयी
स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या गटात मुंबई उपनगर संघाने बाजी मारली. अंतिम लढतीत मुंबई उपनगर संघाने पुणे शहर संघावर १-०ने मात करून विजेतेपद मिळवले. मुंबई उपनगरकडून एकमेव गोल राखी सावंतने (५ मि.) केला.
पुणे जिल्ह्याला उपविजेतेपद
स्पर्धेतील १२ वर्षांखालील मुलांच्या गटात पालघर संघाने विजेतेपद मिळवले. पालघर संघाने अंतिम लढतीत पुणे जिल्हा संघावर १-०ने मात केली. लढतीच्या तिस-याच मिनिटाला ओंकार देशपांडेने गोल करून पालघर संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर पुणे जिल्हा संघाला शेवटपर्यंत बरोबरी साधता आली नाही.
लातूरला जेतेपद
स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात लातूर शहर संघाने विजेतेपद मिळवले. लातूर शहर संघाने अंतिम लढतीत टायब्रेकमध्ये कोल्हापूर संघावर १-०ने मात केली. निर्धारित वेळेत लढत १-१ अशी बरोबरीत सुटली होती. यात कोल्हापूरकडून फरहान मकानदार (६ मि.) याने, तर लातूरकडून समीर चाटे (७ मि.) याने गोल केला. यानंतर टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. यात ओंकार पाटीलने करून लातूर शहरला विजेतेपद मिळवून दिले.