पुणे | पुणे महापालिकेच्या वतीने व भारतीय कुस्ती संघ, महराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या मान्यतेने ‘पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा’ थरार आजपासून २३ ते २५ मार्च दरम्यान कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहे, स्पर्धेचे आयोजक माजी स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव किसन बुचडे, राष्ट्रीय तालीम संघ, पुणेचे कार्याध्यक्ष हिंदकेसरी योगेश दोडके, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य गणेश दांगट, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष टकले सर, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना स्पर्धेचे आयोजक मुरलीधर मोहोळ म्हणाले की, स्पर्धेच्या निमिताने महापौर मुक्ताताई टिळक, पालकमंत्री गिरीशजी बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, एमआयटीचे संस्थापक प्रा. विश्वनाथ कराड, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, आयुक्त कुणाल कुमार, हिंद केसरी गणपतराव आंदळकर, रुस्तुम ए हिंद पै. दादू चौगुले, हिंद केसरी दिनानाथ सिंग, ऑलिम्पिक विजेता सुशील कुमार व आशियाई पदक विजेती गीता फोगट आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र केसरी अभिजित कटके याचा महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
हिंदकेसरी योगेश दोडके म्हणाले की, या स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे हिंदुस्तानी व तुर्कस्थानी मल्लादरम्यान कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तुर्कस्थानचे ईयुप ओरमान, गुऱ्ह्न बलकल, मेटीन टेमिझेक, अहमत सलबस्ट, इस्माईल इरकल हे सहा आंतरराष्ट्रीय मल्ल यावेळी भारतीय मल्लाशी दोन हात करणार आहेत. यांच्या समोर हिंदकेसरी साबा, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, राष्ट्रीय खेळाडू माउली जमदाडे व मुन्ना झुंझुरके यांचे आव्हान राहणार आहे. या लढती पाहण्याची संधी व त्याचा फायदा आपल्या मल्लांना निश्चितच होणार आहे. त्याचबरोबरीने उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे.
पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव किसन बुचडे म्हणाले की, महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला निश्चितच चांगला प्रतिसाद लाभणार आहे. अशा स्पर्धांमुळे आपल्या मल्लांना चांगली कामगिरी बजावण्याची संधी मिळणार आहे.