२०१७हे वर्ष अनेक अर्थांनी देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरासाठी खास ठरले. परंतु मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे ही हे शहर देशाची क्रीडा राजधानीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
त्यात खासकरून पुणे शहरातील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी आणि महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन गहुंजेवर झालेल्या स्पर्धा कायम क्रीडाप्रेमींना लक्षात राहतील.
२०१७ या वर्षात महाराष्ट्रात अनेक मोठ्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धांपैकी काही स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात आल्या होत्या. मग यात नुकतीच पार पडलेली महाराष्ट्र केसरी, आयपीएल, आयएसएलचे सामने यांचा समावेश होता.
२०१७ मध्ये पुण्यात झाल्या या मोठ्या स्पर्धा
१. डेव्हिस कप: जवळ जवळ ४२ वर्षानंतर यावर्षी पुण्यात डेव्हिस कपचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियम, बालेवाडी येथे ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध भारतातील डेव्हिस कप आशिया / ओशनिया ग्रुप I ची स्पर्धा पार पडली.
हे सामने हार्ड कोर्टवर पार पडले. भारतीय संघाने या स्पर्धेत न्यूझीलंडवर ४-१ अशा फरकाने मात केली होती.
पुण्यात या आधी १९७० साली जर्मनी विरुद्ध आणि १९७४ साली रशिया विरुद्ध डेव्हिस कपचे आयोजन करण्यात आले होते.
२. आयपीएल: या वर्षीच्या आयपीएलमध्ये पुणे सुपर जायंट्स संघाचे घरचे सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे घेण्यात आले होते. त्यामुळे पुण्यात जवळ जवळ यावर्षी आयपीएलचे ७ सामने झाले.
तसेच पुण्याच्या संघाने यावर्षीच्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती परंतु त्यांना अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाकडून १ धावेने पराभव स्वीकारावा लागला होता.
मागील वर्षी दुष्काळाच्या कारणाने पुण्यातील सामने दुसरीकडे हलवण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातील क्रिकेट रसिकांना या सामन्यांची मजा स्टेडिअमवरून घेता आली नव्हती.
३. आयएसएल: इंडियन सुपर लीग (आयएसएल) मधेही पुण्याचा संघ असल्याने पुणे सिटी एफसी संघाचे घरचे सामने श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियम, बालेवाडी येथे आयोजित केले आहेत. आयएसएल मधील एकूण ९ सामने पुण्यात होणार आहेत. यातील ४ सामने पार पडले आहेत तर अजून ५ सामने बाकी आहेत.
४. प्रो कबड्डी: यावर्षीचा प्रो कबड्डीचा पाचवा मोसम हा क्रीडाजगतातील सलग चालणाऱ्या स्पर्धांपैकी सर्वात मोठा मोसम ठरला आहे. या मोसमात १३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर असे ८ दिवस पुण्यातील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियम, बालेवाडी येथे ११ सामने रंगले. ऐन दिवाळीत सामने असूनही चाहत्यांनी सामन्यांना मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. पुणे लेगकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष असण्याचे कारण म्हणजे कोणता संघ कोणत्या क्रमांकावर राहणार आणि कुणाला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा फायदा मिळणार?
५.टाटा ओपन महाराष्ट्र: आजपासूनच टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेला सुरुवात होत आहे. पूर्वी चेन्नई ओपन म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा चेन्नईतून पुण्याला हलवण्यात आल्याने तिला टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा असे नाव दिले. संपूर्ण दक्षिण आशियात होणारी ही एटीपी २५० प्रकारातील ही एकमेव स्पर्धा आहे.
या स्पर्धेत मारिन चिलीच, केविन अँड्रेसेन,रॉबेर्टो बॉटिस्टा ऑगट आणि रॉबिन ह्यासे यांसारख्या दिग्गज खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. या स्पर्धेचे सामने श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियम, बालेवाडी येथे रंगणार आहेत.
६. आंतराष्ट्रीय क्रिकेट सामने: यावर्षी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे क्रिकेटचे ३ आंतराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले. यात भारतीय संघाने यावर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक कसोटी सामना तर इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध प्रत्येकी एक वनडे सामना या मैदानावर खेळला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारतावर ३३३ धावांनी विजय मिळवला होता. इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात मात्र भारताने विजय मिळवले होते.
७. महाराष्ट्र केसरी: या वर्षीची महाराष्ट्र केसरीची स्पर्धा पुण्यातील मुळशी तालुक्यातील भूगाव येथे पार पडली. ५ दिवस रंगलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत अंतिम सामन्यात पुण्याच्या अभिजीत कटकेने साताऱ्याच्या किरण भगतला पराभूत करत महाराष्ट्र केसरी किताबाचा मान पटकावला.ही स्पर्धा आजपर्यंतच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धांपेक्षा अनेक अर्थांनी वेगळी ठरली. याला कारण म्हणजे प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर लावलेली हजेरी आणि केलेले योग्य नियोजन. अंतिम सामन्याला अंदाजे ४० हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. २०१७मध्ये पुण्यातच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊनही पुढच्याच वर्षी पुण्याला हा बहुमान मिल्ने ही मोठी गोष्ट होती.