पुण्यात होणार ४ आंतराराष्ट्रीय सामने: क्रिकेट, टेनिस, फुटबॉल आणि कबड्डी सामन्यांची रेलचेल
पुणे । ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना हा पुणेकरांसाठी खास ठरणार आहे. या कालावधीत पुणे शहरात तब्बल ४ वेगवेगळ्या खेळांच्या ४ मोठ्या स्पर्धा होणार आहेत.
प्रो कबड्डी:
प्रो कबड्डीचे पुणे लेगचे सामने हे ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. ह्या लेगचा कालावधी १३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर असा आहे. प्रो कबड्डीच्या पुणे मुक्कामात १२ सामने होणार असून त्यात ६ सामने हे पुणेरी पलटण संघाचे होणार असून यु मुंबाही पुण्यात १४ ऑक्टोबर रोजी पुणेरी पलटण संघाशी भिडणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलँड वनडे सामना:
२५ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलँड यांच्यात एमसीए स्टेडियम, गहुंजे येथे वनडे सामना होणार आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा वनडे सामना असणार आहे. हा सामना दुपारी १ वाजता सुरु होईल.
केपीआयटी-एमएसएलटीए चॅलेंजर टूर :
टेनिस स्पर्धेतील भारतातील दुसरी सर्वात प्रतिष्टेची केपीआयटी-एमएसएलटीए चॅलेंजर टूर ही १३ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या काळात श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे होणार आहे. यात भारतातील दिग्गज टेनिसपटूंसह जगभरातील मोठे खेळाडू भाग घेणे अपेक्षित आहे. त्याचबरॊबर भारतातील आणि दक्षिण आशियातील एकमेव एटीपी वर्ल्ड टूर अर्थात महाराष्ट्र ओपन जानेवारी महिन्यात होणार आहे.
आयएसएल २०१७:
ह्या वर्षीचा आयएसएलचा मोसम दरवर्षी पेक्षा १ महिना उशिरा सुरु होत आहे. हा मोसम १७ नोव्हेंबरला सुरु होऊन मार्च महिन्याच्या अखेरीस हा मोसम संपणार आहे. विशेष म्हणजे यातील महाराष्ट्र डर्बी म्हणून ओळखला जाणारा फुटबॉल क्लब पुणे सिटी आणि मुंबई सिटी फुटबॉल क्लब हा सामना २९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा आयएसएलचा सर्वात मोठा मोसम असून यावेळी २ संघ वाढवून १० संघ झाले आहेत.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पुण्यात होणारे सामने:
१३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर: प्रो कबड्डी, श्री शिवछत्रपती स्टेडियम, बालेवाडी, पुणे
२५ ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलँड वनडे सामना, एमसीए स्टेडियम, गहुंजे, पुणे
१३ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर: केपीआयटी-एमएसएलटीए चॅलेंजर टूर, श्री शिवछत्रपती स्टेडियम, बालेवाडी, पुणे
१७ नोव्हेंबर ते मार्च अखेर: आयएसएल २०१७, श्री शिवछत्रपती स्टेडियम, बालेवाडी, पुणे