वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेत सोमवारी (9 जून) पुणे वॉरियर्स विरुद्ध रायगड रॉयल्स असा सामना खेळला गेला. सायंकाळच्या सत्रात झालेल्या या सामन्यात पुणे वॉरियर्सने अखेरच्या षटकात विजयश्री खेचून आणली. चार विकेट्स राखून विजय मिळवत त्यांनी अंतिम फेरीतील आपली जागा जवळपास निश्चित केल्याचे मानले जात आहे.
प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या रायगड रॉयल्सला या सामन्यात विजय आवश्यक होता. भाविका अहिरे व श्रावणी देसाई यांनी संघाला 42 धावांची महत्त्वपूर्ण सलामी दिली. दोघींनी अनुक्रमे 33 व 27 धावा केल्या. त्यानंतर किरण नवगिरे हिच्या 21 धावा वगळता इतर कोणत्याही फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यांचा डाव 116 पर्यंत सिमित राहिला. पुणे वॉरियर्स संघासाठी अक्षया जाधव व समृद्धी डाळे यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
विजयासाठी 117 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पुणे वॉरियर्स संघाची सुरुवात अत्यंत डळमळीत झाली. किरण नवगिरे व यशोदा घोगरे या दोघींनी पुण्याच्या पाच फलंदाज केवळ 32 धावांमध्ये माघारी पाठवल्या. त्यानंतर कर्णधार अनुजा पाटील व अनुभवी श्वेता माने यांची जोडी जमली. त्यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले. अनुजाने 26 चेंडूंमध्ये महत्त्वपूर्ण 28 धावा केल्या. त्यानंतर श्वेताने नाबाद 37 धावा करत समृद्धी डाळे हिच्यासोबत संघाला विजयी रेषा पार करून दिली.
पुणे वॉरियर्स संघाने आतापर्यंत स्पर्धेत एकही पराभव पत्करलेला नाही. सलग चार विजयासह अंतिम फेरीत खेळण्याची शक्यता सर्वाधिक वाढलीये. तर, रायगड रॉयल्सचे स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा आहे. चार संघांच्या या स्पर्धेत अव्वल दोन स्थानी राहणारे संघ थेट अंतिम सामना खेळतील.






