---Advertisement---

WMPL 2025 ची ट्रॉफी उंचावण्यासाठी पुणे वॉरियर्स सज्ज, असा राहिलाय आतापर्यंतचा प्रवास

On: शुक्रवार, जून 13, 2025 5:40 PM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पहिल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (14 जून) खेळला जाईल. या अंतिम सामन्यात पुणे वॉरियर्स आणि सोलापूर स्मॅशर्स हे गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर राहिलेले संघ खेळणार आहेत. विजेतेपदाचे सर्वात प्रबळ दावेदार असलेल्या पुणे वॉरियर्स संघाचा या स्पर्धेतील आत्तापर्यंतचा प्रवास कसा राहिला, आपण हे जाणून घेऊया.

भारतीय संघाची क्रिकेटपटू अनुजा पाटील हिच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पुणे वॉरियर्स संघाने आपला पहिला सामना सोलापूर स्मॅशर्स यांच्याविरुद्धच खेळला होता. या सामन्यात पुणे संघाने सोलापूरला 149 धावांवर रोखलेले. त्यानंतर अनुभवी श्वेता माने हिच्या 38 व सुहानी कहांडळ हिच्या 36 धावांच्या जोरावर संघाने पाच विकेट्स राखून विजय मिळवलेला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात रायगड रॉयल संघाला पुणे वॉरियर्सने पुरते निष्प्रभ केलेले. चिन्मयी बोरफळे हिच्या 4 बळींच्या जोरावर त्यांनी रायगडला केवळ 102 धावांवर थोपवलेले. या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांनी फक्त दोन बळी गमावत विजय साजरा केला.

स्पर्धेतील त्यांचा तिसरा सामना रत्नागिरी जेट्सविरुद्ध झाला. बलाढ्य संघासोबत झालेल्या या सामन्यात खुशी मुल्ला हिच्या दमदार अर्धशतकामुळे त्यांनी 151 अशी मोठी मजल मारली. या धावांचा बचाव करताना पुन्हा एकदा चिन्मयी बोरफळेने 3 तर कर्णधार अनुजा पाटीलने 2 बळी मिळवत आपल्या संघाला 5 धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला. पुणे संघासाठी रायगड विरुद्धचा चौथा सामना सर्वाधिक अटीतटीचा गेला. गोलंदाजांनी रायगड संघाला 116 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजांनी हाराकीरी केली. मात्र, पुन्हा एकदा श्वेता माने व कर्णधार अनुजा पाटील यांचा अनुभव कामी आला. त्यांनी संयमाने फलंदाजी करत अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.

सलग चार विजयानंतर अंतिम फेरीतील जागा जवळपास पक्की केलेल्या पुणे संघाचा पाचवा सामना पुन्हा एकदा रत्नागिरी जेट्सविरूद्ध झाला. फॉर्ममध्ये असलेल्या पुण्याच्या गोलंदाजांनी रत्नागिरीला 112 धावांपर्यंतच मजल मारू दिली. यानंतर श्वेता सावंत व अक्षया जाधव या युवा फलंदाजांनी जबाबदारी घेत संघाला सहा विकेट्सने विजय मिळवून दिला. पुणे संघाचा अखेरचा साखळी सामना सोलापूर स्मॅशर्सविरूद्ध झाला. स्पर्धेत जबरदस्त फॉर्म दाखवलेल्या चिन्मयी बोरफळे व अनुजा पाटील यांच्या प्रत्येकी तीन बळींच्या जोरावर सोलापूरचा डाव 105 धावांवर संपला.‌ त्यानंतर आरामात या धावसंख्येचा पाठलाग करत, पुणे वॉरियर्सने साखळीत अजिंक्य राहण्याचा कारणामा करून दाखवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---