---Advertisement---

MPL 2025: पुणेरी बाप्पाने फोडला विजयाचा नारळ, गतविजेत्या रत्नागिरी जेट्सचा सलग दुसरा पराभव

On: शुक्रवार, जून 6, 2025 6:38 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये तिसरा सामना रत्नागिरी जेट्स विरुद्ध पुणेरी बाप्पा असा खेळला गेला. पावसामुळे बराच काळ व्यत्यय आलेल्या या सामन्यात अखेर पुणेरी बाप्पाने डकवर्थ लुईस नियमानुसार बाजी मारली. यासोबतच त्यांनी आपल्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. वेगवान गोलंदाज निकित धुमाळ सामन्याचा मानकरी ठरला.

उभय संघांमधील हा सामना दुपारी दोन वाजता सुरू झाला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या रत्नागिरी संघाच्या डावाच्या तिसऱ्याच षटकात पावसाचे आगमन झाले. त्यामुळे सामना जवळपास अडीच तास थांबला. पुन्हा खेळ सुरू झाला तेव्हा सामना प्रत्येकी आठ षटकांचा करण्यात आला. यष्टीरक्षक फलंदाज निखिल नाईक याने केवळ 13 चेंडूंमध्ये एक चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 31 धावा बनवत आपल्या संघाला 69 पर्यंत पोहोचवले. पहिला दोन हंगामात रत्नागिरीसाठी खेळणाऱ्या निकित धुमाळ याने आपल्या दोन षटकात केवळ 14 धावा देत तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

डकवर्थ लुईस नियमानुसार, विजयासाठी 8 षटकात 71 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पुणेरी बाप्पासाठी यश ‌नाहर व मुर्तझा ट्रंकवाला हे सलामीवीर मैदानात उतरले. दोघांनी 4.4 षटकात 51 धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात पुढे केले. विजय पावले याने 12 चेंडूत 18 धावा करणाऱ्या यश याला बाद केले. तर आपल्या पुढच्या षटकातील पहिल्याच चेंडू ट्रंकवाला याचा त्रिफळा उडवला. त्याने 20 चेंडूत 32 धावा चोपल्या. त्यानंतर साहिल औताडे व सुरज शिंदे यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

या विजयासह पुणेरी बाप्पा संघाने गुणतालिकेतील आपले खाते खोलले आहे. मात्र, रत्नागिरी जेट्स सलग दोन पराभवमुळे गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचले. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स वगळता सर्व संघाने कमीत कमी एक सामना खेळला आहे. शनिवारी स्पर्धेत सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तीनही सत्रात सामने खेळले जातील. यामध्ये सर्व सहा संघ सहभागी होणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---