महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 च्या साखळी फेरीची समाप्ती झाली असून, प्ले ऑफ्समध्ये दाखल झालेले चारही संघ जाहीर झाले आहेत. साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या संघाने प्ले ऑफ्समध्ये प्रवेश केला. साखळी फेरीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पुणेरी बाप्पा संघाने हा प्रवास कसा पूर्ण केला, यावर एक नजर टाकूया.
पुणेरी बाप्पा संघाने पहिल्या दोन हंगामात चांगली कामगिरी केली होती. मात्र, त्यांना दोन्ही हंगामात अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात अपयश आलेले. एमपीएल 2025 मध्ये पहिल्याच सामन्यात त्यांची गाठ गतविजेत्या रत्नागिरी जेट्स यांच्याशी पडलेली. पावसामुळे प्रत्येकी आठ षटकांच्या झालेल्या या सामन्यात पुणेरी बाप्पाने 8 विकेट्स राखून विजय मिळवला होता. वेगवान गोलंदाज निकित धुमाळ 3 बळी मिळवून या सामन्याचा मानकरी ठरलेला. रायगड रॉयल्सविरुद्ध झालेल्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 202 अशी मोठी धावसंख्या उभारली होती. यश नाहर व ऋषिकेश सोनवणे यांनी झळकवलेल्या अर्धशतकांनंतर निकित धुमाळने पाच बळी मिळवून संघाला 99 धावांनी सर्वात मोठा विजय मिळवून दिला.
ईगल नाशिक टायटन्स संघाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात मात्र पुणेरी बाप्पा संघाला पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी केवळ 149 धावा केल्या होत्या. मात्र, तरीही गोलंदाजांनी अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली. परंतु, रोहन दामले याच्या खेळीमुळे नाशिक संघाने 5 गडी राखून विजय मिळवला. कोल्हापूर टस्कर्स संघाविरुद्धचा त्यांचा चौथा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. सामना थांबवण्यात आला तेव्हा पुणेरी बाप्पा 3 बाद 129 अशा स्थितीत होते.
पाचव्या सामन्यात रायगड रॉयल्सविरुद्ध पुणेरी बाप्पाला पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पुणेरी बाप्पाने 141 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रायगडने केवळ दोन गडी शिल्लक राखून विजय संपादन केला. स्पर्धेतील महत्त्वपूर्ण सामन्यात पुन्हा एकदा कोल्हापूर टस्कर्स समोर आल्यावर पुणेरी बाप्पाने विजय मिळवला. विजयासाठी मिळालेल्या 187 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना रामकृष्ण घोष व अद्वय शिदये यांनी 101 धावांची शानदार भागीदारी करत संघाला 2 चेंडू राखून विजय मिळवून दिलेला.
हंगामातील त्यांचा सातवा सामना ईगल नाशिक टायटन्स संघाविरुद्ध होता. मात्र, नाशिक संघ प्रथम फलंदाजी करत असताना 13 षटकात 3 बाद 113 अशा स्थितीत असताना सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर सातारा वॉरियर्सविरुद्ध देखील एकाही चेंडूचा खेळ न होता सामना रद्द केला गेला. प्ले ऑफ्स प्रवेशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या झालेल्या रत्नागिरीविरुद्धच्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला. डकवर्थ लुईस नियमानुसार 16 षटकात मिळालेले 132 धावांचे आव्हान त्यांनी एक चेंडू राखून पार करत, सलग तिसऱ्या वर्षी प्ले ऑफ्समध्ये जागा निश्चित केली. तर, हंगामातील त्यांचा शेवटचा सामना सातारा व्हायरस विरुद्ध पावसामुळे होऊ शकला नाही.
पुणेरी बाप्पा 20 जून रोजी पहिल्या क्वालिफायर सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाविरुद्ध भिडेल. या सामन्यात विजय मिळवल्यास ते थेट अंतिम फेरीत दाखल होतील. पराभव झाल्यास त्यांना क्वालिफायर 2 मध्ये खेळावे लागेल. तसेच, पावसामुळे सामना रद्द झाल्यास ईगल नाशिक टायटन्स अंतिम फेरीत पोहोचतील.






