एमपीएल 2025 च्या रणसंग्रामासाठी काही दिवस बाकी आहेत. देशातील या सर्वात मोठ्या राज्य संघटनेच्या टी20 लीगसाठी सर्व आतुर आहेत. स्पर्धेतील सर्वात महागडा व प्रसिद्ध संघ असलेल्या पुणेरी बाप्पा (Puneri Bappa) संघावर सर्वांची नजर असेल. मात्र, या संघातील पाच असे खेळाडू आहेत, ज्यांच्या खेळावर संघाचे स्पर्धेतील भविष्य अवलंबून असेल.
यश क्षीरसागर (Yash Kshirsagar)- संघाचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड हा साखळी फेरीसाठी उपलब्ध नसेल. त्याच्या जागी अनुभवी सलामीवीर यश क्षीरसागर हा संघाचे नेतृत्व करणार आहे. यश मागील तीन वर्षांपासून संघाचा भाग असून, सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. प्रत्येक सामन्यात चांगली सलामी देण्याची व नेतृत्व करण्याची जबाबदारी त्याच्यावर असणार आहे.
सुरज शिंदे (Suraj Shinde)- यश क्षीरसागर याच्याप्रमाणेच सलग तिसऱ्या वर्षी पुणेरी बाप्पा संघासाठी खेळणारा यष्टीरक्षक सुरज शिंदे हा संघाचा आधारस्तंभ आहे. यष्टीरक्षक व फिनिशर अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्याने आतापर्यंत पार पाडल्या आहेत. अनेक सामन्यांमध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने त्याने सामन्याचे निकाल बदललेले दिसतात. हंगामाच्या आधी झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात त्याच्या बॅटमधून स्फोटक 73 धावांची खेळी आली होती.
सचिन भोसले (Sachin Bhosale)- फलंदाजीत अनेक नामांकित खेळाडू असताना पुणेरी बाप्पा संघाचे गोलंदाजीत नेतृत्व सचिन भोसले करतो. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या सचिनने पहिल्या हंगामात पर्पल कॅप जिंकली होती. तर, दुसऱ्या हंगामात देखील 13 बळी त्याने टिपले होते. त्यामुळे सलग तिसऱ्या हंगामात त्याच्या गोलंदाजीवर संघाचे भवितव्य अवलंबून असेल.
मुर्तझा ट्रंकवाला (Murtaza Trunkwala)- एमपीएल 2025 लिलावात मोठी रक्कम देत पुणेरी बाप्पा संघाने अनुभवी सलामीवीर मुर्तझा ट्रंकवाला याला आपल्या संघात सामील करून घेतले. मुर्तझा याच्याकडे मोठा अनुभव असून, सलामीवीर म्हणून तो कर्णधार यश क्षीरसागर याच्यासोबत सलामीला येईल. मागील हंगामात त्याने छत्रपती संभाजी किंग्स संघाचे नेतृत्व केले होते.
निकित धुमाळ (Nikit Dhumal)- सलग दोन हंगाम रत्नागिरी जेट्स संघासोबत विजेता राहिलेला निकित धुमाळ यावर्षी पुणेरी बाप्पा संघासाठी खेळताना दिसेल. डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज असलेला धुमाळ सचिन भोसले व पियुष साळवी यांच्यासोबत जोडी बनवेल. यासोबतच खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत मोठ्या फटके खेळण्याची क्षमता देखील त्याच्याकडे आहे.
एमसीए अध्यक्ष आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिलेला माहितीनुसार, एमपीएल 2025 सोबतच डब्ल्यूएमपीएल (WMPL) ही महिलांची लीग देखील होणार आहे. या दोन्ही स्पर्धा गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जातील. या दोन्ही स्पर्धांसाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. JioHotstar OTT आणि Star Sports 2 टीव्ही चॅनलवर या स्पर्धा पाहता येतील. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 TV Channel)






