प्रो कबड्डीमध्ये आज दुसरा सामना होणार आहे तो पुणेरी पलटण आणि दबंग दिल्ली या दोन संघामध्ये. पुणेरी पलटणचा हा दुसरा सामना असून मागील सामन्यात पुणेरी पलटणने यु मुंबाला पराजित केले होते. दबंग दिल्लीने पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्स सारख्या मजबूत संघाला हरवले होते. पण त्यानंतर दुसरा सामना दबंग दिल्ली गुजरात फॉरचुनजायंट्स कडून हरली होती.
पुणेरी पलटणचा संघ खेळाच्या सर्व पातळ्यांवर मजबूत दिसतो आहे. रेडींग डिपार्टमेंटमध्ये या संघाकडे कर्णधार दीपक निवास हुड्डा आणि राजेश मंडल हे उत्तम खेळाडू आहेत. डिफेन्सही पुणेरी पलटणची मजबूत बाजू असून धर्मराज चेरलाथन, गिरीश एर्नेक आणि संदीप नरवाल आहे तर दीपक हुड्डा देखील उत्तम डिफेंसिव्ह खेळ करू शकतो. आजचा सामना पलटणने जिंकला तर ते ‘झोन ए’च्या गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवेल.
दबंग दिल्ली संघाने पहिल्या सामन्यात जरी चांगला खेळ करून सामना जिंकला असला तरी गुजरात विरुद्धच्या सामन्यात त्यांच्या रेडींग डिपार्टमेंटमधील मर्यादा स्पष्ट दिसून येत होत्या. मिराज शेख जर संघाला रेडींगमध्ये गुण मिळवून देण्यात अपयशी ठरला तर संघ रेडींगमध्ये जास्त गुण मिळवू शकणार नाही आणि ते सामना गमावू शकतात.
या सामन्यासाठी पुणेरी पलटण संघाला विजयाची जास्त संधी असली तरी कबड्डीमध्ये नेहमीच उलटफेर घडतात आणि दबंग दिल्ली आज विजय मिळवून उलटफेर करून दाखवू शकते.