काल पुणेरी पलटण आणि पटणा पायरेट्स यांच्यात प्रो कबड्डीच्या ५ व्या मोसमातील ३८ वा सामना झाला. हा सामना पुण्याने ४७-४२ असा जिंकला आणि पटणाला या मोसमातील पहिली हार दिली. प्रो कबड्डीच्या इतिहासात पुण्याने पाटणाला पहिल्यांदाच हरवले आहे. या दोन संघांमध्ये आतापर्यंत १० सामने झाले आहेत त्यातील ८ सामने पटणाने जिंकले आहेत तर २ सामने बरोबरीत सुटले होते.
पटणाच्या कर्णधार प्रदीप नरवालने आपला अफलातून फॉर्म कायम राखत १९ गुण मिळवले पण त्याला बाकी रेडर्सकडून चांगली साथ मिळाली नाही. त्याचबरोबर काल पटणाच्या डिफेन्सने ही नांगी टाकली. दुसऱ्या बाजूला पुणेरी पलटनच्या राजेश मोंडलने सुपर १० लगावला आणि कर्णधार दीपक हुडाने ही त्याला चांगली साथ देत ९ गुण मिळवले.
पहिल्या सत्रात पुण्याने प्रदीपला शांत ठेवले आणि मोठी आघाडी मिळवली पण दुसऱ्या सत्रात पटणाने सामन्यात पुनरागमन केले. प्रदीपला जेथे पहिल्या सत्रात फक्त ४ गुण मिळाले होते तेथे त्याने दुसऱ्या सत्रात १५ गुण मिळवले पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. रेड गुणांमध्ये दोन्ही संघ जवळ जवळ बरोबरच होते पण डिफेन्समध्ये पुण्याकडे दुप्पट गुण होते आणि हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट बनला.