आज रात्री पुणेरी पलटण आणि बेंगाल वॉरियर्स ऐकमेकांविरुद्ध लढणार आहेत. पुणेरी पलटणला आपले यशाचे शिखर गाठण्यासाठी या आधील सामन्याबरोबरच हाही सामना तितकाच महत्वाचा आहे. या सामन्यात पुणेरी पलटणचा कर्णधार दिपक निवास हुड्डा आणि बेंगाल वॉरियर्सचा डिफेंडर सुरजीत सिंग यांच्यातही चांगली लढत पाहायला मिळणार आहे.
पुणेरी पलटणने याआधी एकूण १४ सामने खेळले असून त्यापैकी ११ सामने जिंकलेले आहेत तर फक्त ३ सामने गमावले आहेत. त्यांचे सध्याचे एकूण गुण ५७ इतके आहेत. त्यांचा मागचा सामना यु. पी. योद्धा यांच्याबरोबर झाला. हा सामना अगदी अटीतटीचा झाला ज्याचा ज्याचा निकाल अगदी सामन्याच्या शेवटच्या क्षणापर्यँत येऊन ठेपला. शेवटी हा सामना पुणेरी पलटणने ३४-३३ असा जिंकला. यात पुणेरी पलटण कर्णधार दिपक निवास हुड्डा याने १७ गुण मिळवलेले, या सामन्यात पुणेरी पलटणकडून सर्वाधिक गुण त्यानेच मिळवलेले. त्याचबरोबर डिफेंडर संदीप नरवाल याने मागच्या सामन्यातील कामगिरी या सामन्यात सुधरवली हे या सामन्यात दिसून येते. तसेच डिफेंडर गिरीश एर्नाक याला आपली कामगिरी अजून चांगली करण्याची संधी या सामन्यात आहे.
बेंगाल वॉरियर्सने या आधी एकूण १९ सामने खेळलेले असून त्यापैकी ९ सामने जिंकले आहेत तर ५ सामने गमावले आहेत. ५ सामने बरोबरीत सोडवण्यात त्यांना यश आले. बेंगाल वॉरियर्सचे सध्या ६४ गुण आहेत. बेंगाल वॉरियर्सचा आधीचा सामना जयपुर पिंक पँथर्स बरोबर होता. हा सामना बेंगाल वॉरियर्सने ३२-३१ असा जिंकला. या सामन्यात बेंगाल वॉरियर्सचा कर्णधार सुरजीत सिंग याची कामगिरी त्याच्या नावाला साजेशी नव्हती. त्याने या सामन्यात एकही गुण मिळविला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात आपली कामगिरी चांगली करण्याची त्याला संधी आहे. संघाचा रेडर मनिंदर सिंग याचे या सामन्यात संघात सर्वाधिक १६ गुण होते. संघाचे ऑल राऊंडर रान सिंग आणि डिफेंडर श्रीकांत यांचीही कामगिरी चांगली होती.
पुणेरी पलटण आणि बेंगाल वॉरियर्स या दोन्ही संघातील डिफेंडर आणि रेडर यांची कामगिरी बघता ती चांगली दिसून येते आहे. तरीही पुणेरी पलटण ऐकामागून ऐक जे सामने जिंकत आलेले आहे त्यावरून हा सामना पुणेरी पलटण जिंकेल असा अंदाज वर्तवला जात आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकण्यासाठी आपल्या संघाची पूर्ण ताकद वापरावी लागेल यात काहीच दुमत नाही.