आज प्रो कबड्डीमधील दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटण भिडणार आहे जयपुर पिंक पँथर्स बरोबर. जयपुरने या मोसमामध्ये फक्त एक सामना खेळला असून त्या सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली होती. तर पुणेरी पलटण संघाने या मोसमाध्ये दोन सामने खेळले असून ते दोन्ही सामने जिंकण्यात पुणेरी संघाला यश आले आहे.
जयपुर संघाचा कर्णधार मंजीत चिल्लर मागील दोन मोसमामध्ये पुणेरी संघाचा कर्णधार होता. या वर्षी त्याला पुणेरी पलटणने संघात कायम केले नाही आणि त्या ऐवजी दीपक निवास हुड्डाला रिटेन करण्यात आले. जयपुरचा पहिला सामना दिल्ली संघासोबत झाला होता आणि त्यात दबंग दिल्ली संघाने जयपुरला मात देत पहिल्याच सामन्यात उलटफेर केला होता.
जयपुरला या सामन्यातील पराजयावर विचार करायला खूप वेळ मिळाला असून आजचा सामना जिंकून गुणांचे खाते उघडण्यास जयपुरचा संघ उत्सुक असेल. या संघाची मदार प्रामुख्याने मंजीत चिल्लर, जसवीर सिंग, के.सिल्वमणी या खेळाडूंवर असून पवन कुमार यांच्याकडूनही चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.
पुणेरी संघ या मोसमातील सर्वात संतुलित संघ आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी यु मुंबाला हरवले होते, तर दुसऱ्या सामन्यात दबंग दिल्लीवर मात केली होती. पुणेरी पलटण ‘झोन ए’ मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पुणेरी पलटणकडे चांगल्या ऑलराऊंडर खेळाडूंचा ताफा असून हा संघ डिफेन्समध्ये खूप मजबूत आहे.
हा सामना जिंकण्यासाठी जयपुरला त्यांचा खेळ खूप उंचवावा लागेल तर मागील दोन्ही सामन्यासारखा खेळ केला तरी हा सामना पुणेरी पलटणला जिंकता येईल. पुणेरी पलटण संघाचे सर्व खेळाडू चांगल्या लयीत असले तरी संघाची पूर्ण जबाबदारी दीपक निवास हुड्डा, संदीप नरवाल, धर्मराज चेरलाथन, राजेश मंडल यांच्यावर असणार आहे.