पुणे: पुण्याच्या सिद्धी शिर्के हिने भारतीय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि सायकलिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६४व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
तिने स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलींच्या ५०० मीटर टाइम ट्रायलमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. तिचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले. तिने रोड सायकलिंगमध्ये ६ किलोमीटर टाइम ट्रायलमध्ये सुवर्णयश मिळवले होते.
ट्रॅक सायकलिंगचे प्रकार म्हाळुंगे-बालेवाडी येथील वेलोड्रम स्टेडियममध्ये सुरू आहेत. मंगळवारी स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलींच्या ५०० मीटर टाइम ट्रायलमध्ये सिद्धी शिर्केने ४५.११० सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. तामिळनाडूच्या एम. पूजा स्वेताने ४७.६१० सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक, तर महाराष्ट्रच्या सुहानी मोरेने ५२.५१७ सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदक मिळवले. स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या ५०० मीटर टाइम ट्रायलमध्ये झारखंडच्या नारायण महतोने ( ४०.१८५ से.) सुवर्ण, महाराष्ट्राच्या अथर्व पाटीलने (४१.६८० से.) रौप्य आणि झारखंडच्या अर्णव श्रीने (४१.८३० से.) ब्राँझपदक मिळवले.
स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या ५०० मीटर टाइम ट्रायलमध्ये दिल्लीच्या लिकझेस अंगमोने ४३.७१० सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या मानसी कमलाकरला (४३.९६० से.) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दिल्लीच्या नावरम चंदने (४४.०७० से.) ब्राँझपदक मिळवले. याच प्रकारात मुलांच्या गटात महाराष्ट्रच्या दीपक मुकणेने ३७.६९२ सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदक पटकावले. यात पंजाबच्या अनमोलप्रीत सिंगने (३७.३४० से.) सुवर्ण, तर दिल्लीच्या संजय सरवानन ( ३७.६३० से.) रौप्यपदक मिळवले.
स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांच्या १ किलोमीटर टाइम ट्रायलमध्ये दिल्लीच्या एम. तनिष्कने १ मिनिट १४.९८० सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या प्रणव कांबळेने १ मिनिट २१.०११ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक, तर तेलंगणाच्या के. प्रणयने १ मिनिट २१.२१० ब्राँझपदक मिळवले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात वेलोड्रम स्टेडियममध्ये ट्रॅक सायकलिंग स्पर्धेचे उद््घाटन झाले. यावेळी एसजीएफआयचे कन्हैया गुर्जर, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, दिपाली पाटील, प्रताप जाधव, दिपाली शिळदणकर, संजय सातपुते, उत्तम नाळे, धर्मेंद्र लांबा, सुदाम रोकडे आदी उपस्थित होते.
निकाल फायनल – १९ वर्षांखालील मुले – १ किमी मीटर टाइम ट्रायल्स – एम तनिष्क (दिल्ली, १ मि. १४.९८० से.), प्रणव कांबळे (महाराष्ट्र, १ मि. २१.०११ से.), के.प्रणय (तेलंगणा, १ मि. २१.२१० से.).
१९ वर्षांखालील मुली – ५०० मीटर टाइम ट्रायल्स – के.आर.वर्षिणी (तामिळनाडू, ४५.४५२ से.), अनिशा सहरान (पंजाब,४६.१४० से.), धन्नमा सी चिचकांडी (कर्नाटक, ४७.४९५ से.).
१७ वर्षांखालील मुले – ५०० मीटर टाइम ट्रायल्स – अनमोलप्रित सिंग (पंजाब, ३७.३४० से.), संजय सरवानन (दिल्ली, ३७.६३० से.), दीपक मुकणे (महाराष्ट्र, ३७.६९२ से.).
१७ वर्षांखालील मुली – ५०० मीटर टाइम ट्रायल्स – लिकझेस अंगमो (दिल्ली, ४३.७१०से.), मानसी कमलाकर (महाराष्ट्र, ४३.९६० से.), नावरम चंद (दिल्ली, ४४.०७० से.).
१४ वर्षांखालील मुले – ५०० मीटर टाइम ट्रायल्स – नारायण महतो (झारखंड, ४०.१८५से.), अथर्व पाटील (महाराष्ट्र, ४१.६८० से.), अर्णव श्री (झारखंड, ४१.८३० से.).
१४ वर्षांखालील मुली – ५०० मीटर टाइम ट्रायल्स – सिद्धी शिर्के (महाराष्ट्र, ४५.११०से.), एम. पूजा स्वेता (तामिळनाडू, ४७.६१० से.), सुहानी मोरे (महाराष्ट्र, ५२.५१७से.)