जगातील सर्वात मोठी टी२० लीग म्हणून विख्यात असलेल्या इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) क्रिकेटजगताला कित्येक मोठे खेळाडू दिले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी आयपीएलद्वारे आपल्यातील धमक सर्वांना दाखवली आहे. त्यातही आयपीएलमुळे युवा शिलेदारांना स्वत:ला सिद्ध करण्याचा मंच मिळाला आहे. याच आयपीएलमुळे प्रकाशझोतात आलेला एक युवा धुरंधर म्हणजे ‘रवि बिश्नोई’.
मोठमोठ्या धाकड फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणारा २० वर्षीय बिश्नोईचा प्रवास अतिशय खडतर राहिला आहे. त्याने आपल्या संघर्षात्मक क्रिकेट प्रवासासंदर्भात अनेक खुलासे केले आहेत.
खेळपट्टी बनवण्याचे केले काम
‘स्पोर्ट्स यारी’ या यूट्यूब चॅनेलवर बोलताना बिश्नोई म्हणाला की, “माझ्यापुर्वी माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने क्रिकेट क्षेत्रात कारकिर्द घडवली नव्हती. एखाद्या क्रिकेट क्लबमध्ये जाऊन क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्याइतकीही आमची परिस्थिती नव्हती. त्यामुळे जोधपुरमध्ये मी माझ्या प्रशिक्षकासोबत मिळून स्पोर्ट्स अकादमी सुरू केली होती. त्याचे नाव आम्ही ‘स्पार्टन’ असे ठेवले होते. परंतु अकादमीतील खेळपट्टी तयार करण्यासाठी आणि इतर सुविधांसाठी आमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे माझ्या मित्रांच्या मदतीने मी सिमेंट वाहणे, विटा उचलणे अशी कामे केली. आम्ही सर्वजण मिळून खेळपट्टीची बांधणी करायचो.”
ट्रायलसाठी सोडली बारावी बोर्डाची परिक्षा
पंजाब किंग्ज प्रतिनिधित्त्व करणाऱ्या बिश्नोईला राजस्थान रॉयल्सने ट्रायलसाठी बोलावले होते. यासंदर्भात बोलताना तो म्हणाला की, “राजस्थान संघाने मला गतवर्षी ट्रायलसाठी बोलावले होते. त्यामुळे मी माझी बारावी बोर्डाची परिक्षा दिली नव्हती. परंतु राजस्थान संघाने ट्रायलनंतर मला निवडले नाही. परंतु अपयश हेच यशाची पहिली पायरी असते, समजून मी प्रयत्न चालू ठेवले. त्यानंतर मला पंजाबकडून संधी मिळाली आणि मी माझे सर्वोश्रेष्ठ देत स्वतला सिद्ध केले.”
रवि बिश्नोईची कामगिरी
बिश्नोई हा प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्याने १९ वर्षांखालील विश्वचषकात आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने १९ वर्षांखालील बांग्लादेश संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात १० षटके गोलंदाजी करत ३० धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर, संपूर्ण विश्वचषकात एकूण २२ विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्याने केला होता.
याव्यतिरिक्त देशांतर्गत स्तरावरील टी२० क्रिकेटमध्ये बिश्नोईने ६ सामने खेळत ६ विकेट्स घेतल्या आहेत. तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्येही त्याने ६ सामन्यात ८ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
आयपीएल २०२० मध्ये पंजाब किंग्जकडून त्याने हंगामातील १४ सामने खेळले होते. दरम्यान २९ धावा देत ३ विकेट्सची सर्वोत्तम कामगिरी करत एकूण १२ विकेट्स घेतल्या होत्या. यंदाही बिश्नोईच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रत्येकाने मंदिरातील घंटा समजून ‘पंत’ची वाजवली; भारतीय दिग्गजाचा कडवट आठवणींना उजाळा
बीसीसीआयची चिंता शिगेला! आयपीएल आधी वानखेडे स्टेडियमचे ‘इतके’ ग्राउंड्समन कोरोना पॉझिटिव्ह
हवेत उडत खेळाडूने अलगद पकडला झेल, फलंदाजाची रिऍक्शन होती लक्षवेधी; पाहा जबराट व्हिडिओ