इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा तिसरा सामना रविवारी (२७ मार्च) पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्स संघाने बेंगलोर संघावर ५ विकेट्सने विजय मिळवला. पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ओडीन स्मिथ ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, त्याने ४ षटके गोलंदाजी करताना शून्य विकेट घेत सर्वाधिक ५२ धावा दिल्या होत्या. मात्र, बेंगलोरच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ८ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह २५ धावांची खेळी केली.
बेंगलोर संघाने दिलेले आव्हान पाहता पंजाबला हे आव्हान पार करणे खूपच कठीण जाईल असे वाटत होते. मात्र, तसे काही झाले नाही. पंजाबच्या फलंदाजांनी हे आव्हान १ षटक शिल्लक ठेवत सहजरीत्या पार केले. या सामन्यात विजय मिळवत पंजाब संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. पंजाबचे +०.६९७ गुण आहेत.
नाणेफेक जिंकत पंजाब संघाने (Punjab Kings) क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि बेंगलोर संघाला (Royal Challengers Bangalore) फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी फलंदाजी करताना बेंगलोरने निर्धारित २० षटकात २ विकेट्स गमावत २०५ धावा केल्या होत्या. बेंगलोरच्या २०६ धावांचे आव्हान पंजाब संघाने १९व्या षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले.
पंजाब संघाकडून फलंदाजी करताना शिखर धवन आणि भानुका राजपक्षे यांनी प्रत्येकी ४३ धावा केल्या. धवनने या धावा करताना १ षटकार आणि ५ चौकार ठोकले होते, तर राजपक्षेने २ चौकार आणि ४ षटकार ठोकले होते. दुसरीकडे कर्णधार मयंक अगरवालने ३२ धावा केल्या. याव्यतिरिक्त ओडीन स्मिथने २५ धावा, शाहरुख खानने २४ धावा आणि लियाम लिव्हिंगस्टोनने १९ धावांचे योगदान दिले. तसेच, आयपीएल पदार्पण करणाऱ्या राज बावाला भोपळाही फोडता आला नाही.
यावेळी बेंगलोर संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. या विकेट्स त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ५९ धावा दिल्या. दुसरीकडे आकाश दीप, वनिंदू हसरंगा आणि हर्षल पटेलने प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना कर्धणार फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plessis) ५७ चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक ८८ धावांची झक्कास खेळी केली. या धावा करताना त्याने ३ चौकार आणि ७ षटकारांचा पाऊस पाडला. याव्यतिरिक्त विराट कोहलीने ४१ आणि दिनेश कार्तिकने ३२ धावांची नाबाद खेळी केली. तसेच, अनुज रावतनेही २१ धावांचे योगदान दिले.
यावेळी पंजाब संघाकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
आयपीएल २०२२चा चौथा सामना नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघात २८ मार्च रोजी वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हे ‘स्लो ओव्हर रेट’ म्हणजे काय रे भावड्या? भल्याभल्या संघनायकांनाही याच्या भितीने फुटतोय घाम
नाद नाद नादच! आता रोहित अन् धोनीसह ‘या’ यादीत विराटचेही घेतले जाणार नाव; पाहा काय केलाय कारनामा