भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कोरिया ओपन सुपर सिरीजच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यात जागतिक मानांकन यादीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूने बिंगजिओ या चायनीज खेळाडूचा २१-१०,१७-२१,२१-१६ असा पराभव केला. अंतिम सामन्यासाठी सिंधूची लढत जपानी खेळाडू नोजोमी ओकुहरा आहे.
सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये सिंधूने विरोधी खेळाडूला थोडीही संधी दिली नाही. तिने सुरुवातीलाच ८-१ अशी मोठी आघाडी मिळवली. त्यानंतर मीड इंटरव्हल साठी सामना थांबला त्यावेळी सिंधू ११-४ अशी पुढे होती. पहिल्या सेटमध्ये अक्रमक खेळणाऱ्या सिंधूने सेट अवघ्या १६ मिनिटात २१-१० असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये देखील सिंधूने आक्रमक खेळावर जास्त भर देत ११-६ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर चायनीज खेळाडूने सेटमध्ये पिछाडी काढत १५-१५ अशी बरोबरी केली. लयीत परतलेल्या बिंगजिओने सिंधूला दुसऱ्या सेटमध्ये संधी न देता दुसरा सेट २१-१७ असा जिंकला.
तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंमध्ये गुणांसाठी खूप चुरस पाहायला मिळाली. सिंधूने ८-६ अशी बढत मिळवली. त्यानंतर मीड इंटरव्हलसाठी सामना थांबला त्यावेळी सिंधूने ११-९ अशी बढत मिळवली होती. सामन्यात उत्तम स्मॅशेसचे प्रदर्शन करत तिने १८-१४ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर तीन गुण मिळवत निर्णायक सेट जिंकत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
यदाकदाचित आपणाला माहिती नसेल तर-
#१ सिंधूने कोरिया ओपन सुपर सिरिज जिंकली तर अशी कामगिरी करणारी तिची पहिली भारतीय खेळाडू ठरेल.
#२ अंतिमफेरीत सिंधूची लढत खेळाडू नोजोमी ओकुहरा हिच्याशी होणार आहे. या दोन खेळाडू मागील महिन्यात झालेल्या बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळल्या होत्या. त्या सामन्यात सिंधूचा पराभव झाला होता.