भारताची आॅलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने आज, 5 जुलैला तिच्या 23 व्या वाढदिवसाच्या दिवशी इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
तिने 36 मिनिटे चाललेल्या या लढतीत जपानच्या अया ओहोरीचा 21-17 21-14 असा सरळ सेटमध्ये सहज पराभव केला. सिंधूचा हा अया ओहोरीवर एकूण पाचवा विजय आहे.
या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूला खूप संघर्ष करावा लागला नाही.
पहिल्या सेटमध्ये सिंधूची सुरुवात खराब झाली होती. ओहोरीने 0-3 अशी आघाडी मिळवली होती. पण मात्र त्यानंतर सिंधूने तिचा खेळ उंचावत नेत ओहोरीला पिछाडीवर टाकत पहिला सेट जिंकून सामन्यात आघाडी घेतली.
दुसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने ओहोरीला आघाडी घेण्याची कोणतीही संधी न देता सामन्यातही विजय मिळवला.
वाढदिवसाच्या दिवशी हा विजय मिळवल्याने सिंधूसाठी तो खास ठरला. आता तिचा सामना चीनच्या हे बिंगजिआओ विरुद्ध होणार आहे.
सिंधूला तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनी सोशल मिडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
एचएस प्रणोयचाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयनेही इंडोनेशिया ओपन स्पर्धेतील पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने तैवानच्या वाँग त्झू वेईचा 21-23 21-15 21-13 असा तीन सेटमध्ये पराभव केला.
पहिल्या सेटमध्ये प्रणॉयला चांगलाच संघर्ष करावा लागला होता. सुरवातीला वेईने आघाडी घेतली होती. परंतू प्रणॉयने चांगली लढत देत सामना 19-19 असा बरोबरीत अाणला होता. परंतू अखेर पहिला सेट वेईने जिंकला.
त्यानंतर मात्र हार न मानता प्रणॉयने दुसरा आणि तिसरा सेट सहज जिंकत सामन्यातही विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना आॅल इंग्लंड विजेत्या तिसऱ्या मानांकित चीनच्या शी युकी विरुद्ध होणार आहे.
फुलराणीचा पराभव:
इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला चीनच्या चेन युफेई विरुद्ध पराभव स्विकारावा लागला.
36 मिनिटे चाललेल्या लढतीत युफेईने सायनाला 21-18, 21-15 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. या पराभवामुळे सायनाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-कुस्तीपटू सुशील कुमार चार वर्षात पहिल्यांदाच झाला पराभूत
-रॉजर फेडरर जगप्रसिद्ध ‘RF’ लोगोच्या हक्कांसाठी नाईकेशी भांडणार ?
-टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या खेळाडूला संघात येताच ही गोष्ट करावी लागते