भारताची स्टार महिला बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूनं पॅरिस ऑलिम्पिकच्या ग्रुप स्टेजमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सिंधूनं बुधवारी (31 जुलै) महिला एकेरच्या सामन्यात एस्टोनियाच्या क्रिस्टन कुब्बाचा सरळ गेममध्ये पराभव केला. यासह सिंधू राउंड ऑफ 16 साठी पात्र ठरली आहे.
दोन वेळाची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं पहिला गेम अवघ्या 14 मिनिटांत 21-5 असा जिंकला. त्यानंतर तिनं दुसरा गेम 21-10 असा जिंकला. हा गेम जिंकण्यासाठी तिला 19 मिनिटे लागली. सिंधूचा ग्रुप स्टेजमधील हा सलग दुसरा विजय आहे. सिंधूकडून यावेळीही पदकाची अपेक्षा असून ती ज्या पद्धतीनं खेळत आहे, ते पाहता पदक जिंकण्याच्या आशा वाढल्या आहेत.
पहिल्या गेममध्ये सिंधूनं क्रिस्टिनाला अजिबात संधी दिली नाही. सिंधूनं पटापट गुण घेत पहिल्या ब्रेकपर्यंत 11-2 अशी आघाडी मिळवली. यानंतरही सिंधूनं कोणतीही कसर सोडली नाही. ब्रेकनंतर क्रिस्टिनाला केवळ तीन गुण घेता आले. सिंधूनं आपल्या दमदार शॉट्सनं क्रिस्टिनाला गोंधळात टाकलं एकापाठोपाठ एक सहज गुण मिळवले. सिंधूनं पहिला गेम 21-5 असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये क्रिस्टिनानं थोडाफार संघर्ष केला. मात्र सिंधूच्या तुलनेत तिचा खेळ अजूनही खूपच कमकुवत होता. या गेममध्ये सिंधूनं पुन्हा कोर्टचा चांगला उपयोग करून गुण घेतले. सिंधूशी कसा मुकाबला करायचा, हे क्रिस्टिनाला समजतच नव्हतं. मात्र या गेममध्ये तिनं काही चांगले स्मॅश मारले, ज्यामुळे ती दुहेरी गुणांचा आकडा गाठू शकली. सिंधून हा गेम 21-10 जिंकत सामना 21-5, 21-10 असा खिशात घातला.
हेही वाचा –
परवानगीशिवाय फोटो वापरला, मनू भाकर या दोन नामंकित ब्रँड्सवर कायदेशीर कारवाई करणार
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आज मेडल मिळेल का? जाणून घ्या पाचव्या दिवसाचं वेळापत्रक
7 महिन्यांची गर्भवती, तरीही ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला; या ॲथलीटच्या खुलाशाने जग हादरले