सध्या ‘इंडिया ए’ संघ श्रीलंका दौऱ्यावर असून, तिलक वर्मांच्या (Tilak verma) नेतृत्वाखाली भारतीय संघ अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबत तिरंगी मालिका (Try-series) खेळत आहे. या मालिकेत कर्णधार तिलक वर्माच्या फलंदाजीचा स्ट्राईक रेट कमालीचा खालावल्याचे दिसत आहे. या वनडे मालिकेत आतापर्यंत 3 सामन्यांत फलंदाजीची संधी मिळूनही त्याला वेगाने धावा करता आलेल्या नाहीत. विशेषतः पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याचा स्ट्राईक रेट खूपच कमी होता.
मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध तिलक वर्माने 97 चेंडूत 60 धावांची संथ खेळी केली. या डावात त्याचा स्ट्राईक रेट केवळ 61.86 होता आणि तो केवळ 2 चौकार व 1 षटकार मारू शकला. दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध त्याने 5 चौकारांच्या मदतीने 73 चेंडूत 66 धावा केल्या, जिथे त्याचा स्ट्राईक रेट साधारण 90 होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने 32 चेंडूत 23 धावा केल्या, ज्यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 71.88 होता. आता शेवटच्या लीग सामन्यात तिलक आपल्या स्ट्राईक रेटमध्ये सुधारणा करतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
या तिरंगी मालिकेनंतर तिलक वर्मा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावरील टी-20 मालिकेत खेळताना दिसणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी त्याची भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करेल. सूर्यकुमार यादवनंतर (suryakumar Yadav) आता श्रेयस अय्यरला टीम इंडियाचा नवीन टी-20 कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
तिरंगी मालिकेपूर्वी, तिलक वर्मा आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळला होता. त्या हंगामात त्याची कामगिरी चांगली होती; त्याने 14 सामन्यांत 29.91 च्या सरासरीने 359 धावा केल्या होत्या आणि त्याचा स्ट्राईक रेट 145.93 होता. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली होती. मात्र, मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच खराब झाली आणि 14 पैकी केवळ 4 सामने जिंकत त्याला गुणतालिकेत 9 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.






