क्विंटन डी कॉक याने वनडे विश्वचषक 2023 सुरू झाल्यापासून जबरदस्त खेळी केली आहे. शुक्रवारी (27 ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात देखील डी कॉक याने आपल्या संघाला वेगवान सुरुवात मिळवून दिली. शाहीन आफ्रिदीला आपल्या पहिल्याच षटकात डी कॉककडून चोप मिळाला. मात्र, आफ्रिदीने आपल्या दुसऱ्याच षटकात बदला घेत संघाला डी कॉकची विकेट मिळवून दिली.
क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याने विश्वचषकाच्या चालू हंगामात आतापर्यंत तीन शतके केली आहेत आणि सर्वाधिक धावा देखील त्याच्याच नावावर आहेत. शुक्रवारी (27 ऑक्टोबर) देखील डी कॉक मोठी खेळी करण्याच्या तयारीत होता. मात्र, शाहीन आफ्रिदीने हे शक्य होऊ दिले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील दुसऱ्या षटकात शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) गोलंदाजीसाठी आला होता. या षटकातील पहिल्या चार चेंडूंवर डी कॉकने चौकार ठोकले आणि पाचव्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. शेवटचा चेंडू जरी शाहीनने निर्धाव टाकला असला, तरी हे षटक मात्र पाकिस्तानसाठी चांगलेच महागात पडले.
असे असले तरी, डावातील चौथ्या षटकात शाहीन पुन्हा गोलंदाजीला आला आणि त्याने डी कॉक याची विकेट घेतली. 14 चेंडू खेळून 24 धावा केल्यानंतर डी कॉक मोहम्मद वसीम याच्या हातात झेलबाद झाला. सोशल मीडियावर शाहीनने आपल्या पहिल्या षटकात झालेली नाचक्की दुसऱ्या षटकात भरून काढली असे बोलले जात आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात विजयासाठी 271 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. संघाची धावसंख्या 34 असताना डी कॉक याच्या रुपात आफ्रिकी संघाला पहिला झटका बसला. त्यानंतर संघाची धावसंख्या 67 असताना कर्णधार टेंबा बाऊमा यानेही विकेट गमावली. (Quinton de Kock, who hit four consecutive sixes, was dismissed by Shaheen Afridi in the very next over)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हरिस रौफ
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एन्गिडी.
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंड संघाबाबत वीरेंद्र सेहवागचं धक्कादायक विधान; म्हणाला, ‘इंग्लंडचा संघ अतिशय…’
रिझवान विरुद्ध यान्सेन, लाईव्ह सामन्यात पाकिस्तान-आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये खडाजंगी